रत्नागिरी:- घरपट्टी थकवणार्यांच्या मालमत्ता जप्त करणे आणि पाणीपट्टी न भरणार्यांच्या नळजोडण्या तोडण्याची कारवाई सुरु झाली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या 3 वेगवेगळ्या पथकांमार्फत ही मोहिम सुरु झाली असून पहिल्याच दिवशी 48 मालमत्ता सील करण्यात आल्या असून 22 नळजोडण्या तोडण्यात आल्या.
रत्नागिरी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती दोलायमान आहे. मागील 2 वर्षे कोरोना संकटामुळे घरपट्टी, पाणीपट्टी वसुली म्हणावी तशी समाधानकारक झाली नाही. कोरोना संकट संपुष्टात आल्यानंतर थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी आरोग्य विभागाच्या घंटागाड्यांवरून विनंती करण्यास सुरुवात झाली. घंटागाड्यांवरील या ध्वनीक्षेपकांवरून कारवाईचाही इशारा दिला जात होता.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या 3 पथकांकडून सोमवारपासून थकीतदारांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. करविभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली सागर सुर्वे आणि इतर कर्मचार्यांनी ही कारवाई सुरु केली आहे. घरपट्टीचे सुमारे 10 कोटी रुपये वसुलीचे लक्ष आहे. त्यातील 6 कोटी 80 लाख रुपये वसुल झाले असल्याचे आखाडे यांनी सांगितले. दरम्यान पाणीपट्टी सुद्धा मोठ्याप्रमाणात थकीत आहेत. पहिल्या टप्प्यात मोठ्या रकमेच्या थकीतदारांची नळजोडणी तोडली जात आहे. सोमवारी 48 मालमत्ता सील करण्यात आल्या असून 22 नळजोडण्या तोडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.