अपघात प्रकरणी कार चालकाला दोन वर्षे सश्रम कारावास

रत्नागिरी:- बेदरकारपणे कार चालवून दोन दुचाकींना धडक देत अपघात केल्या प्रकरणी कार चालकाला न्यायालयाने 2 वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार 600 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

विश्वेश्वर मुरलीधर लिंगायत (47,रा.शिरगांव शिवरेवाडी, रत्नागिरी ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.4 जुन 2017 रोजी सायंकाळी 4.30 वा. तो आपल्या ताब्यातील कार (एमएच- 08-आर- 1217) घेऊन पावस ते रत्नागिरी असा भरधाव येत होता.त्याच सुमारास आनंद श्रीधर मयेकर (रा. हर्चे, रत्नागिरी ) हा आपल्या ताब्यातील शाईन दुचाकी (एमएच- 08-टी- 6622) तर विकास वसंत घवाळी त्यांचा मुलगा वेदांत घवाळी रा. वायंगणी, रत्नागिरी ) याला आपल्या ताब्यातील ऍक्टिवा (एमएच- 08-एसी- 2988) वरून रत्नागिरीच्या दिशेने येत होते.ही तिन्ही वाहने फिनोलेक्स फाटा येथे आली असता विश्वेश्वर लिंगायतने डाव्या बाजूला जाऊन शाईनला तसेच पुढील ऍक्टिवा गाडीला धडक देत अपघात केला होता.याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात भादवी 279, 337,338 आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177, 146, 196 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लिंगायत दोषी असल्याचे शाबीत झाल्याने प्रथम न्यायदंडाधिकारी सातव यांनी त्याला 2 वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार 600 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ऍड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. तर तपासिक अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ आणि पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार दुर्वास सावंत आणि मुरकर यांनी काम पाहिले.