रत्नागिरी:- अनेकाना वाहनांचे प्रचंड वेड असते. आपले वाहन चकाचक, देखणे आसावे आणि त्यात नंबर प्लेट तर आकर्षक आणि लक्षवेधी ठरावी, असा खटाटोप असतो. अशाच आकर्षक आणि पसंती क्रमांकासाठी कितीही पैसे मोजायला तयार असणारी हौशी आहेत. गेल्या वर्षाभरात अशा २ हजार ४४१ हौशींनी पसंती क्रमांक मिळण्यासाठी भरलेल्या पैशातून आरटीओ कार्यालयाला थोडेथोडके नाही तर १ कोटी ९० लाखाचे उत्पन्न मिळाले.
वाहन हे प्रत्येक कुटुंबाची गरज बनली आहे. त्यामुळे आपल्या घरात दुचाकी किंवा चारचाकी वाहन असावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. काहींना ते शक्य होतं काहींनी होत नाही; परंतु अनेकजण कुटुंबातील एक सदस्य म्हणून वाहनाला जपणारे आहेत. त्यामुळे आपले वाहन दिसायला चांगले चकाचक असावे, अंतर्गत बदल चांगला असावा, अशी माफक अपेक्षा असली तरी ते आपल्यासाठी लकी ठरावे, यासाठी त्यांच्या नंबरावर अधिक भर दिला जातो. मग त्या चारअंकी नंबरची बेरीज अपेक्षेप्रमाणे जुळावी यासाठी पसंती क्रमांकाला अधिक पसंती दिली जाते. यासाठी ५ हजार ते लाखापर्यंत रुपये मोजणारे हौशी वाहनधारक आहेत. आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला आवडीचा क्रमांक मिळावा यासाठी २ हजार ४४१ हौशी वाहनधारकांनी ५ हजार ते लाख रुपये मोजले आहेत. यातून येथील उपप्रादेशिक कार्यालयाला जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षात १ कोटी ८९ लाख ७७ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. त्यासाठी या फॅन्सी किंवा चॉइस नंबरमध्ये अनेकांनी दादा, भाऊ, शरद अशी फॅन्सी नंबरप्लेट बनवतात. हे जरी बेकायदेशीर असले तरी हौसेला मोल नाही म्हणतात तसे अनेकजण अशी फॅन्सी नंबरप्लेट तयार करतात. त्यांना कारवाईला तोंड द्यावे लागते.
गेल्या वर्षात फॅन्सी प्लेटवर फॅन्सी नंबर टाकणाऱ्या ३११ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र, तरीही फॅन्सी नंबरचा मोह अनेकांना आवरता येत नाही. जिल्ह्यात अशा अनेक वाहनधारकांचे नंबर आहेत. पसंती क्रमांक निवडताना ठराविक बेरजेचा क्रमांक निवडतात. विशेषतः १, ३, ५, ७, ९,० हे क्रमांक पुनः पुन्हा येतील, असे क्रमांक घेण्याकडे कल अधिक असतो.