खेड:- खेड मधील सात्विनगाव येथे दोन वनरक्षक अधिकाऱ्यांना गैरसमजातून गावकऱ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आली. खेड तालुक्यातील बोरज सात्विनगाव या परिसरात लागलेला वनवा हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच लावल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडला. सरकारी जागेतील वनवा विझवण्यासाठी गेलेल्या दोन वनरक्षकांना सात्विणगावं येथील स्थानिक ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात रविवारी पहाटे खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मारहाण झालेले वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांनी खेड पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री तक्रार दिली असून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे बोरज सात्विन गाव या परिसरात असणाऱ्या सरकारी वनक्षेत्रामध्ये वनवा लागल्याची माहिती त्यांना मिळाली. हा वनवा विझवण्यासाठी वनरक्षक परमेश्वर डोईफोडे दुसरे वनरक्षक अशोक ढाकणे आणि इतर वनविभागातील कर्मचारी त्या ठिकाणी गेले. वनवा विझवत असताना त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी येऊन हा वनवा तुम्हीच लावला आहे, असा गैरसमज करून घेतला. त्या रागातून वनरक्षक परमेश्वर डोईफोडे आणि वनरक्षक अशोक ढाकणे यांना सात ते आठ जणांच्या जमावाने भीषण मारहाण केली. काठीने तसेच लाथा बुक्क्यांनी त्यांना तुडवले. यामध्ये परमेश्वर डोईफोडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला हाताला व पाठीला गंभीर इजा झाली आहेत तर अशोक ढाकणे यांना देखील अनेक ठिकाणी मुका मार लागला आहे.
जखमींवर खेडमधील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांपैकी निलेश फावरे, अरविंद फावरे, धोंडू बैकर याच्यासह आठ जणांवर भादवि कलम 353, 332, 143, 147, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान वन विभागाचे अधिकाऱ्यांना केलेल्या जबरी मारहाणीमुळे खेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.