रत्नागिरी:- तालुक्यातील ओरी- निवईवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. येथील शेतकरी संदीप काशिनाथ देसाई या शेतकऱ्याच्या गाईवर बिबट्याने हल्ला करून गाईला जागीच ठार केले. या घटनेने भयभीत ग्रामस्थांनी बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
शनिवार दि.२१ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने गायी वर हल्ला केला. ओरीत घडलेल्या घटनेची माहिती पिंट्या देसाई यांनी ओरी गावचे उपसरपंच संकेत देसाई व वनविभागाचे अधिकारी श्री.गावडे यांना दिली. वनविभाग घटना स्थळी दाखल होऊन वस्तूस्थितीची नोंद केली. या प्रकाराने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. हल्लेखोर बिबट्यांचा वनखात्यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतून होत आहे.