रत्नागिरी:- रत्नागिरी ः गुजरात जुनागड येथून भारतीय सागरी हद्दीत मासेमारी करण्यासाठी आलेली रत्नसागर नौका रत्नागिरी समुद्र किनाऱ्यापासून 95 नॉटीकलमध्ये बुडाली. बोटीवरील तीन खलाशी समुद्रात बुडाले. त्यातील दोघांचे मृतदेह हाती आले असून एकजण बेपत्ता झाला आहे तर अन्य चौघे पोहत जाऊन त्याच नौकेचा आधार घेत बचावले. त्यांना तटरक्षक दलाने रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात आणले. तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

गुजरात राज्यातील जुनागड येथील रणछोड केशव थापनिया, कौशिक रणछोड थापनिया यांच्या चार नौका मासेमारीसाठी भारतीय सागरी हद्दीत दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. रत्नागिरी समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 95 नॉटीकल आत अंतरावर मंगळवारी रात्री मासेमारी करीत होत्या. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात नांगर टाकून त्यांनी विश्रांतीसाठी नौका थांबवल्या होत्या. जेवण झाल्यानंतर सर्व खलाशी बोटीवरच झोपले.
बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रत्नसागर नौकेची एका बाजुची फळी अचानक निखळली. त्यानंतर समुद्राच्या लाटांचा मारा नौकेवर होत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात आतमध्ये घुसले. काही क्षणातच बोटीने जलसमाधी घेतली. चौघे खलाशी बोटीवरील मोकळ्या जागेत तर दोघेजण केबिनमध्ये, उर्वरित एकजण तळघरात झोपला होता. बोट उलटल्यानंतर कल्पेश लहाने भंडार (वय 30), दीपक भिखार वळवी (वय 38), अंतोल देवल्या भगल (वय 32), जयवंत जंत्र्या खरपडे (वय 50) (सर्व रा. तलासरी) हे समुद्रात पोहत पुन्हा त्याच नौकेचा त्यांनी आधार घेतला. यावेळी केबिनमधील लक्ष्मण वळवी, सुरेश वळवी, मधुकर खटल हे तिघे बेपत्ता झाले. त्यापैकी लक्ष्मण वळवी, सुरेश वळवी या सख्ख्या भावांचा मृतदेह या खलाशांना सापडला. तर मधुकर खटल हा अद्यापही बेपत्ता झाला आहे.
नौका बुडाल्यानंतर याची माहिती कोस्टगार्डच्या एमआरसीसी नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनी तात्काळ जवळ असलेल्या रत्नागिरी तटरक्षक दलाला या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर रत्नागिरी तटरक्षक दलाच्या दोन नौका रत्नागिरीतून मदतीसाठी रवाना झाल्या. याच दरम्यान रत्नसागर नौकेसमवेत मासेमारीसाठी आलेल्या अन्य तीन नौकांनी वाचलेल्या चौघांसह दोन्ही मृतदेह आपल्या नौकेत घेतले होते. तटरक्षक दलाच्या दोन्ही नौका सकाळी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाचलेल्या चार खलाशांसह दोन्ही मृतदेह बुधवारी दुपारी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात आणण्यात आले. तर बेपत्ता खलाशाच्या शोधासाठी तटरक्षक दलाच्या नौका पुन्हा घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
मिरकरवाडा बंदरात आणलेल्या चार खलाशांसह दोन्ही मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. चौघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. ऑपरेशन रत्नसागरसाठी तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मत्स्य विभागाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सौ.तृप्ती जाधव, प्रशिक्षण अधिकारी जे. डी. सावंत, रोहित सावंत, प्राची सावंत यांच्यासह रत्नागिरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांच्यासह पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.