रत्नागिरी:- पुण्याहून गणपतीपुळेकडे जात असताना सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे झालेल्या अपघातात बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावर कोकरुड येथे झाला.
वारणा नदीवर असलेल्या कोकरुड-नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याने वडिलांचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
कोकरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश घोगरे हे कार घेऊन पत्नी रेणुका, चुलत भाऊ महेंद्र, रुपाली, आरव व शिवेंद्र हे सर्वजण सकाळी पुण्यावरुन गणपतीपुळे, रत्नागिरी येथे देवदर्शनासाठी निघाले होते.
महेंद्र आणि आरव हे कार चालकाच्या बाजूला बसले होते. कारमध्ये पाठिमागे बसलेले रुपाली व शिवेंद्र हे जखमी झाले आहेत. जखमींना ताताडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.