रिफायनरीसाठी लवकरच जमिन मोबदला जाहीर करणार: मुख्यमंत्री

रत्नागिरी:- रिफायनरीसारख्या चांगल्या प्रकल्पाला सहकार्य करा, दुटप्पी भुमिका घेऊ नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्प विरोधात राजकारण करणार्‍यांना दिला. तसेच प्रकल्पासाठी जमिन देणार्‍यांनाही चांगला मोबदला दिला जाणार असून त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले; मात्र प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कधी होणार याबाबत त्यांनी सांगितले नाही.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे कोकणावर आणि कोकणचे बाळासाहेबांवर प्रेम हे सर्वज्ञात आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही काम करतोय, म्हणूनच कोकणावर सर्वाधिक लक्ष आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढताना पर्यटन, समुद्र किनारे विकास, गडकिल्ले संवर्धन केले जाईल. कोकण विकासावर कॅबिनेटमध्येही चर्चा झाली असून विकासाला गती देणारे निर्णय घेतले जात आहेत.
रिफायनरी प्रकल्पावर ते म्हणाले, बारसू आणि परिसरातून रिफायनरी प्रकल्पाला पाठींबा असलेल्या लोकांचा वर्ग सर्वाधिक आहे. तरीही सर्वांना विचारात घेऊन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आधीच्या सरकारने प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक पावले उचलली होती. परंतु आधी हो म्हणायाचे आणि नंतर आपल्याच लोकांना सांगुन विरोध करायचा अशी त्यांची पध्दत होती. आता प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रकल्पासाठी जमिन देणार्‍यांनाही चांगला मोबदला दिला जाणार असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य सरकार उद्योगांचे स्वागत करत आहे. रिफायनरी प्रकल्पावर उद्योगमंत्री उदय सामंतही काम करत आहेत. समृध्दी महामार्गाचेही आव्हान होते. त्यावेळीही राजकारण केले जात होते; परंतु ते लोकांनीच हाणून पाडले. तीच परिस्थिती रिफायनरीच्या ठिकाणी पहायला मिळेल. हा जनतेच्या हिताचा असून प्रत्येकाला रोजगार देणारा आहे. यामधून प्रत्येकाची भरभराट होईल. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीने पहायला पाहीजे. त्यात राजकारण करता कामा नये. मागील सरकारमधील प्रमुखांकडून प्रकल्पाला विरोध करायचा आणि तो झाला की त्याचे श्रेय घ्यायला धावायचे. अशी दुटप्पी भुमिका कुणीही घेऊ नये. कोकणात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

एमएसआरडीएमार्फत सागरी महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गाचे काम कंत्राटदाराच्या चुकांमुळेच रखडले आहे. सध्या ते काम युध्दपातळीवर सुरु आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत. कोकणातील समुद्र किनारे एकमेकांशी जोडण्यासाठी सागरी महामार्ग एमएसआरडीएच्या माध्यमातून प्रस्तावित केला आहे. त्यावर लवकरच काम केले जाईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

बारमाही सिंचनासाठी पाण्याचा उपयोग

कोयनेतील वाहून जाणार्‍या पाण्याचा प्रश्‍न माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम हे सातत्याने उपस्थित करत आहेत. त्यावरही काम करण्याच्या सुचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. या पाण्याचा वापर बारमाही सिंचनासाठी कसा करता येईल यादृष्टीने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे युध्दपातळीवर करत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.