सहाय्यक निबंधकांकडून निर्णय; सदयसंख्या अपूर्ण राहिल्याने दिलासा
रत्नागिरी:- जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअमनवर दाखल करण्यात आलेला अविश्वासाचा ठराव सहाय्यक निबंधकांकडून नामंजूर करण्यात आला. सत्ताधारी परिवर्तन पॅनेलचे चेअरमन असून त्यांच्याविरोधात सहकार पॅनेलकडून हा ठराव दाखल केला गेला होता. ठराव मंजूरीच्या सभेला दोन तृतीयांश संचालक उपस्थित राहणे आवश्यक होते; परंतु पंधरापैकी दहाच सदस्य उपस्थित राहीले. एक सदस्य अनुपस्थित राहिल्याने चेअरमनवरील अविश्वासाचे बालंट टळले.
रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेकरीता परिवर्तन पॅनेलने २०१५-१६ मध्ये पहिल्यांदाच सहकार क्षेत्राचे मैदानात उतरुन चाळीस वर्षे एक हाती सत्ता असलेल्यांना धक्का दिला होता. बहुमताच्या जोरावर परिवर्तन पॅनेलने चेअरमनपदाच्या तीन टर्म पूर्ण केल्या. दरम्यानच्या काळात फोडाफोडीच्या राजकारणामुळे सहकार पॅनेलने परिवर्तनला धक्का दिला. सहा-सहा महिन्यांचे चेअरमनपद देण्याचे आश्वासन देऊन सहकार पॅनेलने सत्ताधार्यांचे पाच उमेदवार फोडले. परंतु हा बदल फार काळ टिकला नाही. सहा महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे पर्शुराम निवेंडकर चेअरमनपदी विराजमान झाले. काही दिवसांपूर्वी श्री. निवेंडकर यांच्या विरोधात सहकार पॅनेलने अविश्वासाचा ठराव मांडला. मंगळवारी (ता. १३) सायंकाळी सहाय्यक निबंधकांनी अविश्वास ठरावाच्या बैठकीचे पतसंस्थेच्या सभागृहात आयोजन केले होते. या बैठकीला ठराव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्य उपस्थित राहणे आवश्यक होते. पतसंस्थेचे एकूण १६ संचालक असून त्यातील एक संचालक निवृत्त झाला आहे. कार्यरत १५ संचालकांपैकी ११ संचालक अविश्वास ठरावाच्या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे होते; परंतु प्रत्यक्ष बैठकीवेळी १० संचालक उपस्थित राहिले. दोन तृतियांश संचालक उपस्थित नसल्यामुळे निबंधकांनी प्रस्ताव फेटाळला आणि चेअरमनपद अबाधित राहिले.
दरम्यान, अविश्वास ठरावाविरोधात सत्ताधारी परिवर्तन पॅनेलकडून तांत्रिक बाजू भक्कम ठेवण्यासाठी राजू जाधव, प्रशांत कांबळे, श्री. निवेंडकर, श्री. रेळेकर, श्री. तांबे, श्री. गोरीवले, विजय मोहिते यांनी विशेष प्रयत्न केले होते. परिवर्तन पॅनेल उर्वरित कालावधीत पतसंस्थेत नियोजनबद्ध आर्थिक शिस्त लावून सर्व सभासदांकरीता विश्वासाचे वातावरण तयार करेल, असे चेअरमन श्री. निवेंडकर यांनी सांगितले.