राज्यातील पहिल्या ॲक्टिव थ्रीडी तारांगणाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

११ कोटी ५८ लाखांचा खर्च:पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना आले यश

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हावासियांचे अंतराU पहाण्याच स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.राज्यातील ॲक्टिव थ्रीडी असलेले हे पहिलेच तारांगण असून सुमारे ११ कोटी ५८ लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. याचा शुभारंभ दि.१६ डिसेंबरला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या  हस्ते होणार आहे.

रत्नागिरीकरांना चंद्राचा पृष्ठभाग कसा दिसतो याचे जवळून दर्शन घडेल आणि लघुगृह कसे आदळतात याचाही अनुभव घेता येणार आहे.आंब्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या रत्नागिरी शहरामधे नव्याने विकसित करण्यात आलेले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण सज्ज झाले आहे.  या नवीन स्टेट ऑफ द आर्ट, ॲक्टिव स्टिरीओ ३ डी तारांगणामधे खगोलीय वस्तूचे प्रत्यक्ष अनुभव (रिअल टाइम) देणारे आणि तारांगणाचे गुंग करणारे ३ डी शो दाखवले जाणार आहेत.

भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून रत्नागिरी नगरपरिषदेने तारांगण (प्लॅनेटेरियम) आणि विज्ञान भवन (सायन्स पार्क) विकसित करण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.या तारांगणातील आधुनिक उपकरणे मुंबईच्या इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पुरविली जात असून कार्यान्वितही केली जात आहेत.विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या लोकप्रियतेसाठी अथकपणे करण्यासाठी स्थापन झालेली वचनबद्ध संस्था म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यात अभिमान बाळगणाया इन्फोव्हिजनने डिजिटल उत्पादनातील ॲक्टिव ३डी तारांगण क्षेत्रामधे जागतिक आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या इव्हान्स आणि सदरलँड कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या सहकार्याने भारतात ५० हून अधिक अत्याधुनिक तारांगणांची स्थापना केली आहे. यामधे आशियातील पहिले डिजिटल तारांगण, मुंबई येथील नेहरू तारांगण, (२००३) आणि पिलिकुला मंगलोर (२०१८) येथील भारतातील पहिले ॲक्टिव ३डी डिजिटल तारांगण स्वामी विवेकानंद तारांगण; यांचा समावेश आहे.

रत्नागिरी येथील हे तारांगण महाराष्ट्राचे पहिले तर भारतातील पाचवे ॲक्टिव ३डी तारांगण असेल. रत्नागिरीचे हे ॲक्टिव ३डी तारांगण म्हणजे डिजिस्टार ७ ची २डी आणि ॲक्टिव ३ डी प्लेबॅक सॉफ्टवेअरने सुसज्ज अशी खगोलशास्त्रीय प्रतिक्रुती (स्ट्रोनॉमी सिम्युलेशन) आहे. डिजिस्टारचे रिअल‚टाइम ग्राफिक इंजिन प्रगत भौतिकशास्त्रावर आधारित प्रस्तुतीकरण प्रणालीमुळे ग्रहांच्या पृष्ठभागावरील अत्यंत सूक्ष्म तपशील प्रस्तुत करण्यास सक्षम आहे. डिजिस्टारचे हे सॉफ्टवेअर अमेरिकेच्या नासाच्या डिजिटल युनिव्हर्समधील डेटा बेसच्या आधारे विकसित केलेले आहे.

डिजिस्टार रिअल टाइममध्ये आकारमानात्मक (व्हॉल्यूमेट्रिक) डेटा प्रस्तुत करण्यासाठी एक अत्यंत प्रगत अल्गोरिदम वापर असल्यामुळे अंतरिक्षातील ढग, नक्षत्रसमूह आणि आकाशगंगा हे सर्व प्रत्यक्ष आकारमानाच्या स्वरूपात प्रदर्शित केले जाऊ शकतात. आधुनिक आणि ऐतिहासिक अवकाशयान, निरीक्षणे, धूमकेतू, लघुगृह आणि अशी बरीच माहिती देणारी डिजिस्टारची १०० हून अधिक प्रत्यक्षदर्शी (रिअल टाइम मॉडेल्स) उपलब्ध आहेत.तारांगणाचे खेळ (शो) मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये असतील. तसेच प्रत्येक खेळ (शो) ३०‚३५ मिनिटांचा असेल. या तारांगणाची आसन क्षमता (प्रत्येक खेळासाठी) ६५ आसनांची आहे. या तारांगणाच्या उभारणीचा आराखडा आणि तांत्रिक बाबींसाठी सल्लागार म्हणून श्री. केतन करडीले, सार्थ एंटरप्राइजेस, पुणे; याचे सहकार्य लाभले आहे.