रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील समुद्रात मासेमारी करताना जाळ्यात सापडलेल्या कासवाला येथील स्थानिक मच्छीमार तरुणांनी पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले.
काळबादेवी येथील मच्छीमार तरुण संदेश मयेकर, भाऊ रुपेश मयेकर मनोज बिर्जे हे शनिवारी मासेमारी करीता नौका घेऊन समुद्रात गेले होते. मासेमारीसाठी जाळे समुद्रात सोडले असता या जाळ्यात समुद्री कासव अडकले. जवळपास ४० ते ५० किलो वजनाच्या या कासवाची जाळ्यातून सुटका स्थानिक मच्छीमार तरुणांनी केली. जाळ्यातून कासवाला सोडवत कासव पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. या सर्व घटनेचे चित्रीकरण या तरुणांनी केले आहे. पूर्वी देखील या तरुणांनी मासेमारी जाळ्यात सापडलेल्या कासवांना पुन्हा समुद्रात सोडून देत जीवदान दिले आहे.