राजन साळवी यांना अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय नेत्याकडून खेळी 

रत्नागिरी:- बारसूत प्रस्तावित असलेल्या रिफानरी प्रकल्पाला उघड-उघड समर्थन देणारे राजापूरचे आमदार राजन साळवी सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांच्या हीट लीस्टवर पुर्वीपासून आहेत. रिफायनरीच्या रणात केंद्रीय नेत्यांकडून आमदार साळवी यांना अडचणीत आणण्याची खेळी सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. साळवी यांच्याविरोधात आंदोलन झाल्यानंतर त्यांना समर्थन देणाऱ्या अनेक शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात निवेदने दिली. तेव्हाही त्या केंद्रीय नेत्याने शिवसैनिकांना फोनाफोनी केल्याची चर्चा आहे. यावरून साळवी यांच्या भूमिकेमुळे त्यांचे पक्षांतर्गत खच्चीकरण सुरू असल्याची चर्चा उघड उघड सुरू आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीचा मुद्दा सध्या जास्तच गाजत आहे. यापूर्वी देखील त्यावरून रण पटले होते. पण त्यावेळी विषयाला वेगळे वळण लागले. कोकणात येणारी गुंतवणूक आणि रोजगार या माध्यमातून रिफायनरीला समर्थन वाढले असल्याने स्थानिक आमदार व पदाधिकारी देखील स्थानिकांच्या रोजगारासाठी बाजूने झुकलेले दिसत आहेत. परंतु याच भुमिकेमुळे शिवसेनेत मोठी राजकीय ठिणगी पडताना दिसत आहे. राजन साळवी हे रिफायनरीच्या समर्थनार्थ उभे आहेत तर खासदार विनायक राऊत विरोधात, असा प्रकार शिवसेनेतच सुरू आहे. त्यामुळे शिवसैनिक संभ्रमात आहेत.
शिवसेनेत काही वेगळेच वारे वाहू लागले आहे. एक बाजू विरोधाची तर दुसरी बाजू  समर्थनाची हा विरोधाभास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच  पक्षात सुरू आहे. हा प्रकल्प व्हावा म्हणून स्वतः उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना केंद्राशी पत्र व्यवहार करून आपण राजापूर तालुक्यातील बारसु येथे ग्रीन रिफायनरी करण्यास अनुकूल असल्याचे नमूद केले होते. याचा विसर काही नेत्यांना पडलेला आहे.
नुकतेच आमदार राजन साळवी यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहून आपली समर्थनाची बाजू मांडली होती.त्यामुळे साळवींच्या विरोधात केलेले आंदोलनही वरिष्ठ नेत्यांनी स्थानिकांची दिशाभूल करून करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे. त्यानंतर राजन साळवी यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संरक्षणाबाबत निवेदन दिले. तेव्हाही केंद्रीय नेत्याने फोनाफोनी केल्याची चर्चा आहे. यापूर्वीही साळवी यांचे वेळोवेळी याच नेत्याने राजकीय खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा आहे. काल केंद्रीय नेत्याने फोनाफोनी करूनही जिल्ह्यातील शिवसैनिकांनी राजन साळवी ह्यांच्या समर्थनार्थ सर्व पोलिस ठाण्यात निवेदन दिले. रिफायनरीच्या रणात केंद्रीय नेत्यांकडुन स्थानिक आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.