ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना- भाजप येणार एकत्र; आज निर्णयाची शक्यता

रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा लवकरच उडणार असून रत्नागिरी तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचा निर्णय शुक्रवारी (ता. २५) होण्याची शक्यता आहे. यावर पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक होणार असल्याची माहीती पुढे आली आहे. तालुक्यात २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून नऊ ठिकाणी थेट सरपंचपदासाठी भाजपकडून दावा करण्यात आली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे विरुध्द शिंदे गटाकडून प्रत्येक निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची सत्ता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थंाच्या निवडणुकीत ही युती कायम राहणार का याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आला होता; मात्र त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या दोन प्रमुख पदाधिकार्‍यांची भाजपच्या पदाधिकार्‍यांबरोबर प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी युती करण्यावरही चर्चा झाली. निवडणुकीत थेट सरपंचपदाचे उमेदवार रिंगणात उभे करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपनेही ग्रामीण भागात पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. एकेकाळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार होता. तेव्ही शिवसेनेबरोबर युती होती. त्यामुळे काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपची ताकद आजही आहे. सत्तेचा फायदा घेऊन ग्रामीण भागातील ताकद वाढविण्यासाठी आता पदाधिकारी सज्ज झाले आहेत. यासाठी रत्नागिरी तालुक्यात नऊ ठिकाणी थेट सरपंचपदासाठी भाजपकडून दावा करण्यात आला आहे. अठरा ठिकाणी शिंदे गटाचा म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला सोडण्याची तयारी झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. २५) रत्नागिरीत दौर्‍यावर येत आहेत. यावेळी भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीची ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय होईल. याला भाजपच्या पदाधिकार्‍यांकडूनही दुजोरा मिळाला आहे.