जिल्हा परिषद आदर्श ग्रामसेवक पुरस्काराला पाच वर्षानंतर मुहूर्त

रत्नागिरी:- जिल्हा परिषदतर्फे देण्यात येणार्‍या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराला अखेर 5 वर्षानंतर मुहूर्त मिळणार आहे. मागील 5 वर्षांचे पूरस्कार एकदम जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 9 तालुक्यांतून प्रस्तावही मागविण्यात आला आहे.

चांगले व उत्कृष्ट काम करणार्‍या ग्रामसेवकांना दरवर्षी आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मात्र गेली पाच वर्षे हे पुरस्कारच जाहीर करण्यात आले नव्हते किंवा त्यासाठी प्रस्तावच मागविण्यात आले नव्हते. हे पुरस्कार का जाहीर करण्यात आले नाहीत हे कारण गुलदस्त्यात आहे. परंतू आता या पुरस्कारासाठी मुहूर्त मिळाला आहे.
 

पुरस्कासाठी ग्रामपंचायतीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या दालनात ग्रामसेवक संघटनेची बैठक पार पडली. यावेळी या पुरस्काराबाबत चर्चा करण्यात आली. एकूण 9 तालुक्यांतून 1 पुरस्कार दिला जाणार आहे.

साधारण हे पुरस्कार डिसेंबर महिन्यात जाहीर करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून अहवालही मागविण्यात आले आहेत. गेली पाच वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 45 जणांना हे पुरस्कार मिळणार आहे.