रत्नागिरी:- ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ डिसेंबरला मतदान व २० ला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडी विरोधात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा आमनेसामने उभी राहणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील २८ ग्रामपंचायती असून पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
निवडणुक आयोगाकडून मुदत संपुष्टात येणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली होती. निवडणु विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंडणगड १४, दापोली ३०, खेड १०, चिपळूण ३१, गुहागर २०, संगमेश्वर ३५, रत्नागिरी २८, लांजा १८ आणि राजापूरमधील ३० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची धुळवड रंगणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष मंडणगड-खेड-दापोली आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघावर राहणार आहे. या मतदार संघातील दोन्ही आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. नुकत्याच झालेल्या रत्नागिरीतील चार ग्रा.पं. निवडणुकीत शिंदे गटाला ठाकरे गटाने शह दिला होता. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. ग्रामीण भागातील मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतो हे पहायला मिळणार आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा आकडा अधिक असल्याने ही निवडणुक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची सत्वपरिक्षा ठरणार आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे मंत्रिमंडळात उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघाबरोबरच आजूबाजूच्या मतदारसंघातही ग्रामपंचायतींवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.
जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी तहसीलदार १८ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणार आहेत. त्यानंतर २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागवले जातील. अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होईल. ७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. त्यानंतर निवडणूक लढवणार्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्द केले आहे.