रत्नागिरी :- जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यात 828 बालके कुपोषित आढळून आली असून त्यात 64 बालके अति तिव्र कुपोषित (सॅम) आहेत. कोरोनाच्या कालावधीतही घरीच न्युट्रीशिअन्स फुड दिल्यामुळे 38 अति तिव्र बालकांचे वजन वाढले आहे. उर्वरित 26 बालकांना होम व्हिसीडीसीद्वारे घरपोच आहार आणि न्युट्रीशिअन्स फुड दिले जाणार आहे.
गतिमान जीवन, आहार पध्दती यामुळे जिल्ह्यात कमी वजनाच्या जन्मलेल्या बालकांची संख्या वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून आहार आणि औषधे दिली जातात. तीन वर्षांपर्यंतच्या बालकांचा यामध्ये समावेश असतो. दर तिन महिन्यांनी याचे सर्व्हेक्षण केले जाते. कोरोनामुळे एप्रिल महिन्यात सर्व्हेक्षण करता आलेले नव्हते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कुपोषित बालकांची माहिती पुढे आली आहे. त्यांच्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी तालुकास्तरावर सुचना दिलेल्या आहेत.
कोरोनाच्या कालावधीतही अंगणवाडीसेविकांमार्फत कुपोषित बालके, गरोदर माता यांना आवश्यक आहार घरीच उपलब्ध करुन दिला होता. जिल्ह्यात सापडलेल्या अतितिव्र कुपोषित बालकांमधील 38 बालकांना मार्च महिन्यात तीस दिवसांसाठी दिला जाणारा व्हीडीएफ एनर्जी डेन्स न्युट्रीशिअन फुडचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे ती बालके सॅममधून मॅममध्ये समाविष्ट झालेली आहेत. सध्या 26 बालके शिल्लक असून त्यांच्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून पावले उचलली जात आहेत. अति तिव्र कुपोषित बालकांसाठी महिला व बालकल्याण विभागाकडून गावच्या ठिकाणी व्हीसीडीसी केंद्र सुरु केली जातात. अंगणवाडी केंद्रामध्ये त्या बालकांना एनर्जी डेन्स न्युट्रीशिअन फुड दिले जाते. तिस दिवसांचा हा डोस असतो. सलग दिल्यानंतर महिन्याभरानंतर बालकाचे वजन नियमित होते.
एनर्जी डेन्स न्युट्रीश्अिन फुड असे ईडीएनएफ ला म्हटले जाते. बालकांच्या वजन आणि प्रतिकार शक्ती वाढीसाठी आवश्यक अन्न घटक असलेला पदार्थ आहेत. वयोमानानुसार तो बालकांना खाऊ घातला जातो. एखाद्या बाळाला दिवसातून तिनवेळा प्रमाणानुसार देण्यात येतो. चॉकलेटप्रमाणे हा पदार्थ आहे. होम व्हीसीडीसीमध्ये आईने तो मुलाला दिवसातून द्यावयाचा आहे.
याबाबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. ए. आरगे म्हणाले, कोरोनामुळे लॉकडाऊन असलेल तरीही अंगणवाडीसेविकांनी कुपोषित बालकांना वेळच्यावेळी पुरक न्युट्रीशिअन फुडचे वाटप केले. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत सापडलेल्या अति तिव्र कुपोषित बालकांसाठी घरीच व्हीसीडीसी सुरु करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक फुडची मागणी केली आहे.