बेपत्ता विवाहितेचा मृतदेह भगवती बंदर येथे दोनशे फूट खोल दरीत सापडला; अपघात की घातपात तपास सुरु

रत्नागिरी:- शहातील खालचा फगरवठार येथून बेपत्ता विविहितेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भगवती बंदर येथील कडेलोट पॉइंट येथून सुमारे दोनशे फूट खोल दरीत हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. 

दरम्यान बेपत्ता सौ.तन्वी रितेश घाणेकर यांनी आत्महत्या केली की कोणता घातपात केला हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तन्वी या बाजारात दुचाकी वरुन गेल्या होत्या. मात्र त्या घरी न परतल्याने पती रितेश घाणेकर यांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली.

२९ सप्टेंबर रोजी रात्री ७.१५ वाजण्याच्या सुमारास  त्यांची मुलगी आनंदी हिला, मी बाजारात जावून येते. उशिर झाला तर जेवण करुन घ्या असे सांगत त्या बाजारात गेल्या होत्या.  त्या त्यादिवशी रात्री घरी परतल्या नाहीत. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी दि.३०सप्टेंबरला शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांचा मृतदेह हाती लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.