खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृद्धाच्या साधेपणाचा फायदा घेत बँकेतून तब्बल 85 लाख 82 हजार 161 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या संदर्भात अरविंद चंदुलाल तलाठी या 66 वर्षीय वृद्धाने खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
विक्रम सरोही, श्रीवास्तव, राणा, कविता शर्मा, अभिजित बॅनर्जी, अजित मुदलिक, विठ्ठलभाई पटेल, अभय शुक्ला, प्रमोद ठाकूर या नऊ जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद तलाठी यांच्या पत्नीच्या नावाचा संदर्भ देत त्या वयस्कर व्यक्तीचा विश्वास संपादन करत त्याच्याकडून बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या तीन बँकांच्या खेड शाखेतून तब्बल 85 लाख 82 हजार 161 रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या संदर्भात रत्नागिरी पोलिसांनी तपास यंत्रणा सज्ज केली आहे. आजपर्यंत खेड मधील हि सर्वात मोठी फसवणुकीची घटना ठरली आहे.