पहिला व्यापारी येईल त्याला संपवायचाच; एक महिन्यापूर्वीच आखला होता सोनाराने कट 

रत्नागिरी:- कर्जबाजारीपणाला कंटाळून लोकांची देणी भागवण्यासाठी रत्नागिरीत येणार्‍या व्यापार्‍याला संपवण्याचा प्लॅन एक महिन्यापूर्वी सोनाराने आखला होता. त्यातूनच किर्तीकुमार अजयराज कोठारी (वय ५५, रा. भाईंदर मुंबई) यांची दुकानात गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. 

रत्नागिरीतील सुवर्णकार गेल्या काही दिवसांपासून भूषण खेडेकर हा वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. अनेकांचे पैसे त्याने हडप केले होते. दागिन्यांच्या ऑर्डर घेऊन ग्राहकांना दागिनेच दिले नव्हते. त्यामुळे अनेकवेळा त्याला ग्राहकांनी पोलीस स्थानक दाखवले होते. लोकांना ठकवण्याचा प्रकार त्याचा वाढत चालला होता. मोठ्याप्रमाणावर तो कर्जबाजारी झाला होता. त्यातूनच त्याने सोने-चांदी व्यापार्‍याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

एक महिन्यापूर्वी प्लॅन

या व्यापार्‍याची हत्या करण्यापूर्वी भूषण याने १ महिन्यापूर्वीच हत्येचा प्लॅन केला होता. जो व्यापारी दुकानात येईल त्या व्यापार्‍याची हत्या करायची असा त्याचा प्लॅन होता. त्यामुळे तो रत्नागिरीत व्यापारी कधी येतायत, याची वाट पाहत होता.

अनेक व्यापार्‍यांशी संपर्क

यातील सोनार भूषण सुभाष खेडेकर याने आपल्या प्लॅननुसार बाहेरील व्यापार्‍यांशी संपर्क साधला होता. सतत त्यांना तो संपर्क करत होता. आप आईये.. माल खरीदना है.. अशा आशयाचे मेसेज तो अनेक व्यापार्‍यांना करत होता.

जो येईल त्याची हत्या

भूषण याने आखलेल्या प्लॅनमध्ये जो व्यापारी पहिला आपल्या दुकानात येईल, त्या व्यापार्‍याची हत्या करायची आणि त्याच्याकडील माल लंपास करायचा, असा प्लॅन त्याने आखला होता. त्या प्लॅननुसार तो व्यापार्‍यांची डोळे लावून वाट पाहत होता.

पहिला व्यापारी वाचला

किर्तीकुमार भूषण याच्या दुकानात जाण्यापूर्वी अन्य एक व्यापारी त्याच्या दुकानात जाणार होता. त्या व्यापार्‍याच्या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात माल होता. मात्र त्या व्यापार्‍याच्या मनात अचानक काहीतरी आले आणि तो व्यापारी भूषण याच्या दुकानाकडे वळलाच नाही. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. 

किर्तीकुमार सापडले

या घटनेत किर्तीकुमार यांनादेखील तो वारंवार संपर्क करीत होता. अखेर ठरल्याप्रमाणे किर्तीकुमार रात्रीच्यावेळी त्याच्या दुकानात गेले. त्यावेळी भूषण व त्याचे दोन साथीदार त्याठिकाणी उपस्थित होते. शिकार आपणच चालत आली, असे मनातल्या मनात म्हणत तिघेही व्यापार्‍याची हत्या करण्यासाठी सज्ज झाले.

तिघेही तुटून पडले

व्यापारी दुकानात आल्यानंतर त्यातील एकाने दुकानाचे शटर झटकन खाली ओढले आणि काही कळायच्या आत त्या तिघांनी व्यापार्‍याला लादीवर आडवे पाडले. तिघेही त्या व्यापार्‍यावर तुटून पडले होेते. व्यापारी आरडाओरड करू नये यासाठी त्याचे तोंड दाबून ठेवले होते.

गळा आवळला

भूषण याच्या दुकानात गेलेल्या किर्तीकुमार कोठारी यांना संपवण्याच्याच हेतूने भूषण व त्याच्या सहकार्‍यांनी त्यांना लादीवर पाडून तिघांनी मिळून त्यांचा गळा आवळला. अवघ्या काही क्षणांत किर्तीकुमार यांनी तडफडून प्राण सोडला.

मृतदेह दुकानातच

किर्तीकुमार यांचा दुकानात खून करून तिघेही दुकानातून निघून गेले होते. किर्तीकुमार यांचा मृतदेह दुकानातच होता. मृतदेहाची विल्हेवाट केव्हा लावायची याचा प्लॅन त्यांनी आधीच केला होता. त्यामुळे कुणाला संशय येऊ नये म्हणून ते तिघे तिथून निघून गेले होते.

हॉटेलमधून जेवण मागवले

यातील भूषण हा किर्तीकुमार यांचा खून करून नेहमीप्रमाणे घरी निघून गेला. घरी जाण्यापूर्वी त्याने हॉटेलमधून चमचमीत जेवणाचे पार्सल घेतले होते. घरी जाऊन तो आपल्या कुटुंबियांसमवेत जेवला आणि रात्रीच्यावेळी तो आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला.

मृतदेह रशीने बांधला

रिक्षेतून मृतदेह न्यायचा असल्याने किर्तीकुमार यांचा मृतदेह एका पोतलीत कोंबण्यापूर्वी त्या तिघांनी मान आणि पाय एकत्र बांधले आणि त्यानंतर मृतदेह मासेमारी जाळ्यात गुंडाळून एका गोणपाटात कोंबला. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू केली होती.

दीड वाजता रिक्षा निघाली

मिळालेल्या माहितीनुसार यातील महेश मंगलप्रसाद चौघुले (वय ३९, रा. मांडवी) याची रिक्षा होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास तो रिक्षा घेऊन भूषण याच्या दुकानाकडे आला. त्यावेळी भूषण व अन्य एक त्याचा साथीदार त्याठिकाणी हजर होते. गोणपाटात कोंबलेला मृतदेह रिक्षेत टाकून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रिक्षा भातगावच्या दिशेने निघाली.

पहाटेच्या सुमारास आबलोलीत पोहोचले

किर्तीकुमार यांचा मृतदेह गोणपाटात बांधून महेश चौघुले व फरीद महामुद होडेकर (वय ३६, रा. भाट्ये) हे दोघे रिक्षा घेऊन आबलोली खोडदे येथील एका छोट्या पुलावर पोहोचले. त्यावेेळी पहाटे साडेचार वाजले होते. रिक्षेतून खाली उतरून त्यांनी नदीच्या दिशेने चालत जात किर्तीकुमार यांचा मृतदेह पाण्यात टाकला व तेथून ते माघारी परतले.

सीसीटीव्ही फुटेज कामी आले

सोने-चांदीचे व्यापारी किर्तीकुमार हे रत्नागिरीतून गूढरित्या गायब झाल्याचे समजताच पोलिसांनीदेखील त्याची गंभीर दखल घेतली आणि रत्नागिरी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. शेवटचे सीसीटीव्ही फुटेज समाधान ज्युस सेंटर परिसरात तपासण्यात आले आणि तेच फुटेज पोलिसांच्या कामी आले.

अवघी दीड किलो चांदी

कर्जबाजारी झालेल्या भूषण याने रत्नागिरीत येईल त्या व्यापार्‍याची हत्या करायची आणि त्याच्याकडील दागिने हडप करायचे. मोठे घबाड हाती लागेल या इर्षने हत्येचा कट रचला. किर्तीकुमार यांची हत्या केली. मात्र हत्येनंतर अवघी दीड किलो चांदी त्याच्या हाती लागली. त्यामुळे भूषण भलताच नाराज झाला. 

अवघे ३५ हजार रुपये देणे

मिळालेल्या माहितीनुसार भूषण हा किर्तीकुमार यांचे अवघे ३५ हजार रुपये देणे होता. मात्र इतरांची देणी भरपूर होती. त्यामुळे जो पहिला व्यापारी आपल्या दुकानात येईल त्याचीच हत्या करायची आणि मोठे घबाड घेऊन गायब व्हायचे असा प्लॅन त्याने आखला होता. मात्र त्याचा प्लॅन फसला. भूषण आणि त्याचे दोन साथीदार पोलिसांच्या तावडीत सापडले.