रत्नागिरी:- विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावरून 15 सप्टेंबरपासून प्रवासी रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर चालविल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त प्रवासाच्या अध्यायासाठी सज्ज झाल्या आहेत. 15 सप्टेंबर पासून तुतारी तर 20 सप्टेंबर पासून मांडवी आणि कोकणकन्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत.
कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण मागील सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हे पूर्ण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देखील कोकण रेल्वेच्या कामगिरीची प्रशंसा केली होती. मात्र सहा महिने होऊनही विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर मालगाड्या आणि एक प्रवासी गाडी सोडली तर सर्व प्रवासी गाड्या डिझेल इंजिनसह धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामापैकी सर्वात महत्वाच्या असलेल्या सबस्टेशनची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वेला लांबणीवर टाकावे लागले होते. मात्र आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस ( ट्रॅक्शन सबस्टेशन ) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने रेल्वेने दिनांक 15 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजय वर चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवासी रेल्वे गाड्या विजेवर चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार दिनांक 15 सप्टेंबरपासून दादर सावंतवाडी तुतारी तसेच मंगला एक्सप्रेस विद्युत इंजिनसह धावणार आहेत. त्यापाठोपाठ मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस तसेच दिवा -सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस या प्रवासी गाड्या दिनांक 20 सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत. मडगाव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडी देखील 15 सप्टेंबरपासून विजेवर जाणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
या मार्गावरून जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस दि. 15 ऑक्टोबरपासून तर मुंबई- मेंगलोर एक्सप्रेस 1 जानेवारी 2023 पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई सीएसटी ते करमाळी दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस 15 ऑक्टोबर 2022 पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. याचबरोबर उर्वरित गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.