स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरण गंभीर वळणावर; पती सुकांत सावंत यांची कसून चौकशी

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.स्वप्नाली  सावंत या बेपत्ता झालेल्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिसांनी पोलिसांनी तपासाचे लक्ष्य पती सुकांत सावंत यांच्याकडे वळविले आहे. शुक्रवारी मिर्‍या येथील सुकांत सावंत यांच्या घराची झडती घेण्यात आली.  तर डॉग स्कॉडमार्फत घरासह नजीकच्या समुद्र किनारा परिसरात सर्च घेण्यात आला. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत स्वप्नाली सावंत यांचा शोध लागलेला नव्हता.

पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहितकुमार गर्ग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांनी स्वप्नाली सावंत यांच्या घर परिसराची पाहणी केली. मात्र आठ दिवसानंतरही स्वप्नाली सावंत सापडलेल्या नसल्याने त्या बेपत्ता झाल्या की घातपात झाला? या दृष्टीने पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, दि.1 सप्टेंबरपासून सौ.स्वप्नाली सावंत आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दि.2 सप्टेंबरला पती सुकांत सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा शोध घेतला. परंतु त्या कोठेच आढळल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्यास आठ दिवसांपेक्षा अधिक कालावधी
उलटल्यामुळे या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी लक्ष घातले आहे .
सौ. स्वप्नाली सावंत यांना शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांचे विशेष पथक तयार केले असून त्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनित चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण विष्णू यांच्यासह अभ्यासू पोलीस अंमलदारांचा समावेश आहे

शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह पोलिसांचे पथक मिर्‍या येथील सुकांत सावंत यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. घर व परिसराची पाहणी केल्यानंतर दुपारनंतर भारतीय शिपयार्ड कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या किनारपट्टी भागात डॉगस्कॉडमार्फत सौ. सावंत यांचा शोध घेण्यात आला. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्याबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही.
स्वप्नाली सावंत या आठ दिवसापूर्वी बेपत्ता झाल्यानंतर नेमक्या गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे? पती सुकांत सावंत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तपास करत आहेत. परंतु सौ.सावंत अद्यापपर्यंत न सापडल्याने त्यांच्या बेपत्ता होण्यामागील गुढ कायम राहिले आहे. त्या बेपत्ता झाल्या की त्यांचा घातपात झाला? याबाबत अजुनही कोणतेही ठोस वृत्त दैनिक रत्नागिरी एक्सप्रेसच्या हाती आलेले नाही. मात्र डॉ.गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाकडून शिस्तबद्धरित्या पोलीसांनी शोध सुरु केला आहे. लवकरच तपासामध्ये यश मिळेल असा विश्वास डॉ.गर्ग यांनी व्यक्त केला आहे.