जिल्ह्यात आज एक लाख बाप्पांचे विसर्जन

रत्नागिरी:- गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात १ लाख ६५ हजार गणेशमूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. पाच दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर सोमवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख १४ हजार ९६५ बाप्पांना सोमवारी निरोप देण्यात येईल. गौरी गणपतीला मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्त्यांचे विसर्जन होणार असल्याने शहरातील मांडवीसह जिल्ह्यातील प्रमुख्य विसर्जनस्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

बुधवारी गणेशचतुर्थीला वाजत-गाजत अगदी पारंपारीक पध्दतीने जिल्ह्यात सर्वत्र गणरायाचे आगमन करण्यात आले. दीड दिवसांची सेवा केल्यानंतर दहा हजार बाप्पांना दीड दिवसांनी निरोप देण्यात आला. यानंतर शनिवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले. शनिवारी गौरी पुजन तर रविवारी जिल्हाभरात सर्वत्र सण साजरा करण्यात आला. यानंतर सोमवारी जिल्ह्यात पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येईल.

यामध्ये १४ सार्वजनिक आणि १ लाख १४ हजार ९६५ गणरायांना निरोप देण्यात येईल. यापैकी रत्नाागिरी शहरामधील ५ हजार ५३१ घरगुती तर ४ सार्वजनिक गणेशेमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ७ हजार ९९४ घरगुती गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. जयगड परिसरात १ हजार ७१७ घरगुती आणि १ सार्वजनिक संगमेश्वर ९ हजार १७७ घरगुती, राजापूर १०,६७४ घरगुती, नाटे ५ हजार ६३२ घरगुती, लांजा ११ हजार ७७० घरगुती, देवरूख ८ हजार १७०, सावर्डे ९ हजार ३२२ घरगुती, चिपळूण ९ हजार ७७५ घरगुती आणि ३ सार्वजनिक, गुहागर ९ हजार २० घरगुती, अलोरे ५ हजार ३०० घरगुती, खेड १० हजार ६०२ घरगुती तर ३ सार्वजनिक, दापोली २ हजार ५०० घरगुती तर १ सार्वजनिक, मंडणगड ३ हजार ५६ घरगुती तर १ सार्वजनिक, बाणकोटमध्ये ३९५ घरगुती तर २ सार्वजनिक, पूर्णगडमध्ये ३ हजार ३५१ खासगी आणि दाभोळमध्ये १ हजार २७९ खासगी गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. 

रविवारी साजरा झाला तिखटा सण

शनिवारी जिल्हाभरात गौरीचे आगमन झाले. वाजत-गाजत पारंपारीक पध्दतीने गौरीचे पुजन करण्यात आले. गौरी- गणपतीच्या सणाचे कोकणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनिवारी सर्वत्र गौरीचे आगमन झाले. काही ठिकाणी सुवासीनीनी खड्याची गौर नदीकाठी, विहिरीपाशी किंवा पाणवट्यावर जावून चार खडे घेऊन त्यांची पूजा केली तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे आणून त्यांची पूजा केली. यानंतर दुसºया दिवशी म्हणजे रविवारी जिल्हाभरात सण साजरा करण्यात आला. काही ठिकाणी गौरीला तिखटा नैवेद्य दाखवण्याची प्रथादेखील जोपासण्यात आली.