आज साजरा होणार तिखटा सण
रत्नागिरी:- गणेशाच्या आगमनानंतर शनिवारी घरोघरी गौरीचे आगमन झाले. अगदी वाजत-गाजत आणि खास करून कोकणात बैलगाडीतुन पारंपारीक पध्दतीने गौरी घरोघरी विराजमान झाली. शनिवारी उपवासाचा नैवेद्य दाखवल्यानंतर रविवारी कोकणात सर्वत्र तिखटा सण करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी तर गौरीला नॉनव्हेज नैवेद्य दाखवण्याची प्रथा असून आजही ही प्रथा पाळली जाते.
झिम्मा फुगडीच्या तालावर आणि ठिकठिकाणच्या पाणवट्यावरून वाजत-गाजत गौरीचे डहाळे घेऊन आलेल्या माहेरवाशीनींसह मुलींचे औक्षण करून सुवासिनींनी देव्हाºयावर गौरीला विराजमान केले. दुपारनंतर मुखवट्यासह सजलेल्या गौरी उभारण्यासाठी गृहीणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. दागिन्यांनी मढलेल्या आणि मांगल्याचा साज ल्यालेल्या गौरीला शनिवारी व्हेज नैवेद्य दाखवण्यात आला असला तरी कोकणातील अनेक घरांमध्ये रविवारी गौरीला नॉनव्हेज नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
गणपती पाठोपाठ कोकणात गौरीचे धुमधडाक्यात स्वागत केले जाते. गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठादेखील फुलुन जातात. मागील दोन दिवसापासून गौरीच्या स्वागतासाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले होते. गौरीचे मुखवटे, गौरीची मूर्ती यावर्षी आकर्षणाचा विषय होता. त्याचसोबत गौरीला लागणारी ठूशी, मंगळसूत्र, नथी, कंबरपट्टी, गौरी मुकूट, बोरमाळ, मोहनमाळ आदी साळित्यांनी बाजारपेठ फुलुन गेली होती.
गुरूवारी सकाळपासूनच गौरी आणण्यासाठी गडबड उडाली होती. ठिकठिकाणच्या विहीरी, नद्या तसेच पाणवट्यावर सुवासीनी आणि मुलींनी गर्दी केली होती. भरजरी साड्या नेसून आलेल्या सुवासीनींपासून ते मुलींपर्यंतचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. झिम्म्याचे फेर धरतच गौरीच्या डहाळयाची पूजा करण्यात आली. यानंतर पारंपारीक वाद्याच्या निनादात गौरी मिरवणुकीने आपआपल्या घरी नेण्यात आल्या.