गडकिल्ले वाचवण्यासाठी सोमेश्वरमधील तरुणाची देखाव्यातून साद

रत्नागिरी:- गडकिल्ल्यांचे जतन व्हावे यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला असताना आता सोमेश्वर मधील तरुणाने गणेशोत्सव देखाव्यातून गडकिल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे. पावनखिंड सिनेमा पाहिल्यानंतर प्रेरणा घेत हा देखावा साकारल्याची प्रतिक्रिया सोमेश्वर येथील मयूर भितळे या तरुणाने दिली.

मयूर भीतळे हा रत्नागिरीतील सोमेश्वर येथील रहिवासी आहे. मागील चार वर्षे हा तरुण गणपतीला देखावा साकारत आहे. मात्र, यावर्षी मयूरने साकारलेला देखावा लक्षवेधी ठरत आहे. यावर्षी मयूरने देखाव्यातून गडकिल्ले बचाव करण्याचा संदेश दिला आहे.

यावर्षीच्या देखाव्यात मयूरने पावनखिंड आणि विशाळगडची प्रतिकृती उभारली आहे . ज्या दिवशी पावनखिंड चित्रपट पाहिला त्या दिवशी बाजीप्रभू हृदयामध्ये भरले आणि त्याच दिवशी हा देखावा गणेशोत्सवात साकारण्याचा निश्चय केल्याचे मयूर याने सांगितले. स्वराज्याच्या राजांना सुखरूप विशालगडापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलून घोडखिंडीला पावनखिंड बनवणाऱ्या महायुद्धाला मानाचा मुजरा या देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मयूर याने सांगितले.

महाराजांचे किल्ले ही स्वराज्याची आठवण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावत हे किल्ले स्वराज्यात आणले. या किल्ल्याचे पावित्र्य जपण्याचे काम प्रत्येकाचे आहे असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
स्वराज्याचे किल्ले सुरक्षित रहावे व पुढील अनेक पिढ्यांना महाराजांचे कार्य माहिती व्हावेत यासाठी हे किल्ले सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

मयूर याने पावनखिंडच्या बाजूला किल्ले विशालगड हा किल्ला बनवला आहे. आज विशाल गडावर अनेक ठिकाणी अस्वछता आहे. किल्ल्यावर घाणीचे खूप साम्राज्य आहे. विशालगडावरील कचऱ्याचे साम्राज्य कमी झाले पाहिजे. विशालगडासह महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर स्वच्छता राखली पाहिजे असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. हा देखावा साकारताना मयूरला अभिजीत आलीम याने मदत केली.