गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 21 आरोग्य केंद्र सज्ज

रत्नागिरी:- गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील महामार्गावर प्रवास करणार्‍या नागरिकांना आपत्तीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी विशेष आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येत आहेत. एकूण 21 ठिकाणी ही आरोग्य तपासणी केंद्र असणार आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मुंबईगोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होते. या वेळी अपघात होऊन जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. यात तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी खेड – हॉटेल अनुसयाजवळ, हॅप्पी धाब्याजवळ, भरणे नाका, भोस्ते घाट. चिपळूण – सवतसडा, कळंबस्ते फाटा, बहादूरशेख नाका, खेर्डीनाका, कापसाळ, अलोरे, सावर्डे. संगमेश्वर – आरवली, तुरळ, गोळवली. देवरूख फाटा, मुर्शी. रत्नागिरी – हातखंबा तिठा, पाली. लांजा – वेरळ, कुवे गणपती मंदिर. राजापूर – राजापूर बसस्थानक ही केंद्र असणार आहेत.  

गणेशोत्सवानिमित्त रविवार, 28 ऑगस्टपासूनच कोकणात जाणार्‍या वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. 31 ऑगस्टपासून त्यात आणखी वाढ होणार असून अपघाताची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत व्यवस्था केली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य सहायक, आरोग्य सेविका आणि चालकासह एक अ‍ॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात येणार आहे. 11 सप्टेंबरपासून  ही केंद्रे कार्यरत असणार आहेत.