पडीक गोठ्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या

उपासमारीने मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथे गुरांच्या पडीक गोठ्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत बिबट्या आढळला आहे. जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. दापोली तालुक्यातील कोंढे येथेही 24 जुलैच्या दरम्याने गुरांच्या गोठ्यात बिबट्याचा मृत्यू झाला होता.

साखरपा येथील विनायक बोबडे यांचा पडीक गोठा जंगलमय भागात होता. या गोठ्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत बिबट्या आढळला. या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे. 

 याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोवडे येथील जीवन गणपत रवांडे हे त्यांच्या मालकीची गुरे ‘अंबाबन’ याठिकाणी चरावयास घेऊन गेले होते. परत येते वेळी वाडीच्या पूर्वेस सुमारे १ कि. मी अंतरावर त्यांना काहीतरी कुजल्याची दुर्गंधी येत होती. त्यांनी पुढे जाऊन अंदाज घेतला असता गावातील विनायक गणपत बोबडे यांच्या पडीक गोठ्यातून वास येत असल्याचे लक्षात आले. गोठ्यात डोकावून पाहिले असता बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. तो पूर्ण कुजलेल्या स्थितीत होता.

 यानंतर त्यांनी ही बाब गावचे पोलिस पाटील प्रदीप अडबल व ग्रामस्थ यांना कळवली. याची महिती देवरूख वनविभागाला देण्यात आली. यानंतर विभागीय वनाअधिकारी दिपक खाडे, विभागीय वनाअधिकारी श्रीमती. स्नेहलता पाटील, श्री. सचिन निलख व परिक्षेत्र वनाअधिकारी श्री. प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे परिमंडळ वनाअधिकारी  श्री. तौफिक मुल्ला, सर्वश्री वनरक्षक सूरज तेली, आर. डी. पाटील, संजय रणधीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पशुवैद्यकिय अधिकारी श्री. कदम व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर वनविभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. हा बिबट्या नर जातीचा असून तो बरेच दिवस उपाशी असल्याने त्याचा भूकेने मृत्यु झाला असावा, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडल्यास वनविभागचा टोल फ्री क्रमांक १९२६ यावर माहिती देण्याचे आवाहन वनविभागतर्फे प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल, रत्नागिरी यांनी केले आहे.