जिल्ह्यात पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम 

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर सलग दुसर्‍या दिवशीही कायम आहे. त्यामुळे भातशेतात पाणी साचुन ती हिरवीगार दिसू लागली आहे. नद्या, नाल्यांसह धबधब्यांचे पाणी वाढले आहे. वेगवान वारे आणि पावसामुळे मच्छीमारीला ब्रेक बसला आहे. गिलनेटने मासेमारी करणार्‍यांनी नौका बंदरातून बाहेरच काढलेल्या नाहीत.

शनिवारी (ता. ७) सकाळ ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ५६.२९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत १८२०.४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरवारी सायंकाळपासून मुसळधार सरींना आरंभ झाला. शनिवारीही पावसाचा जोर कायम आहे. दिवसभर पडणार्‍या पावसामुळे अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले होते. रत्नागिरी शहरातील मांडवी, मच्छीमार्केट परिसरासह ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. पावसाचा जोर ओसरला की पाणी कमी होत होता. संततधारेमुळे कोठेही नुकसान झालेले नाही. वाशिष्ठी, जगबुडी, अर्जुना, काजळी नदी पात्रातील पाणी वाढले आहे. परंतु इशारा पातळीपर्यंत पाणी पोचलेले नव्हते. दोन दिवस पाऊस राहिल्यामुळे भातशेतीला पुरेसे पाणी मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंता दूर झाली आहे.
वारा आणि पाऊस सतत राहिल्यामुळे समुद्र खवळलेला असून अनेक मासेमारी नौकांनी जवळच्या किनार्‍याचा आसरा घेतला आहे. हर्णेच्या नौका मिरकरवाडा बंदरात सुरक्षेसाठी दाखल झालेल्या आहेत. काहींनी जयगड बंदरावर नांगर टाकून ठेवला आहे. सध्या ट्रॉलिंगसह गिलनेटने मासेमारी सुरु आहे. वातावरण बिघडल्याचा फटका मासेमारीला बसलेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लाटांचा वेग वाढल्यामुळे गिलनेटद्वारे मासेमारी करणार्‍या नौका समुद्रात नेणे धोकादायक ठरते. त्यामुळे काळबादेवी, साखरतर, जयगड परिसरातील काही मच्छीमारांनी मासेमारीलचा मुहूर्त पुढे ढकलला आहे.