युवासेना तालुका अधिकारीपदी प्रसाद सावंत 

रत्नागिरी:- शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर रत्नागिरीमध्ये जाहीर झालेली पदेही वैयक्तिक कारणे सांगून नाकारली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यावर युवासेना तालुकाधिकारी पदाची जबाबदारी संघटनेने दिली आहे.

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर रत्नागिरीमध्येही शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये उभी फूट पडली आहे. ग्रामीण भागातील पदाधिकारी अद्याप शिवसेना संघटनेशी बांधिल असले तरी रत्नागिरी शहरातील माजी लोकप्रतिनिधी व काही पक्षाचे पदाधिकारी यांनी आ. उदय सामंत यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे रत्नागिरीतील काही पदाधिकार्‍यांची शिवसेनेने हकालपट्टी केली. यानंतर नव्या नियुक्त्याही पक्ष संघटनेने केल्या. परंतु दोन पदाधिकार्‍यांनी नियुक्त्यानंतर आपल्या पदाचा पुन्हा राजिनामा दिला. त्यामुळे नव्या नियुक्त्यांकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले होते.

रत्नागिरी तालुका युवाधिकारी पदावर कुणाची नियुक्ती होते याकडे लक्ष लागलेले असतानाच रत्नागिरी शहर संघटक पदाची जबाबदारी सांभाळणारे कट्टर शिवसैनिक प्रसाद सावंत यांच्यावर पुन्हा एकदा तालुका युवाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वीही प्रसाद सावंत यांनी तालुका युवाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या या निवडीचे तालुक्यातील युवा पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे. आमदार राजन साळवी, सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा संपर्कप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, अ‍ॅड. सुजित कीर यांनी त्यांचे अभिनंदन केले.