खेड:- तालुक्यातील शिंगरी व किंजले तर्फे नातू या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी प्राप्त झालेल्या २८ लाख ७ हजार ३७३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक पोपट कुसुम भोरजे यांना १९ जुलै रोजीअटक करण्यात आली आहे. त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या अपहार प्रकरणाची फिर्याद ग्रामविस्तार अधिकारी श्री.शरद साहेबराव भांड यांनी येथील पोलीस स्थानकात दिली होती.
सन २०१५ ते २०१७ या कालावधीत प्राप्त झालेल्या २८ लाख ७ हजार ३७३ रुपयांच्या शासकीय निधीचा वापर गावच्या विकासासाठी न करता स्वतः च्या फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाल्याने या ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक श्री.भोरजे यांना अटक होऊन आता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे अधिक तपास करीत आहेत.