संगमेश्वरात किरकोळ वादातून कोयतीने वार, दोघेजण जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील ओझरे खुर्द गणेशवाडी येथे शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून चुलत्याने पुतण्यावर कोयती व विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना काल रविवार १७ जुलै रोजी घडली.

संतोष विठोबा जागुष्टे (४२) , विठोबा रघुनाथ जागुष्टे (दोघेही रा. ओझरे खुर्द, गणेशवाडी, संगमेश्वर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबतची तक्रार संतोष जागुष्टे यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार प्रकाश रघुनाथ जागुष्टे (५०), साई सुभाष जागुष्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुल्लक कारणावरून संतोष जागुष्टे यांना चुलते प्रकाश जागुष्टे , साई जागुष्टे यांनी हातातील कोयतीने डाव्या खांद्यावर व पंजावर वार करून जखमी केले. यामध्ये त्यांना मुका मार लागला. तसेच संतोष यांचे वडिल विठोबा जागुष्टे यांच्या हातावर व खांद्यावर कोयतीने व विळ्याने वार करुन जखमी केले. अशी तक्रार पोलीस स्थानकात संतोष जागुष्टे यांनी दिली आहे. त्यानुसार प्रकाश जागुष्टे व साई जागुष्टे यांच्यावर भादविकलम ३२४ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.