जिल्ह्यात धरणातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर

रत्नागिरी:- यावर्षी पूर्व मोसमी समाधानकारक झाल्यानंतर आलेल्या मोसमी पावसानेही आता संपूर्ण कोकण व्यापला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील 50  दिवसातच कोकणातील धरणातील जलसाठा अन्य विभागाच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. गतवर्षी कोकणातील धरणसाठा या कालावधीत 38 टक्के होता. यावर्षी पाऊसमान समाधानकारक असल्याने तो जवळपास 60 टक्क्यांवर पोहचला आहे.

जूनच्या अखेरपर्यंत पावसाने दिलेल्या ओढीमुळे कोकणात पाऊस सरासरी पूर्ण करण्याबाबत साशंकता होती. त्यामुळे कोकणातील जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत पिछाडीवर होता. जूनच्या अखेरपर्यंत पावसाने दिलेल्या ओढीमुळे कोकणातील अनेक भागात पाणीटंचाईही उद्भवली होती. मात्र, गेल्या पंधरावड्यात पावसामुळे कोकणातील जलस्तर वाढू लागला आहे. पावसाने 50 दिवसात 45 टक्के सारसरी गाठली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने दीड हजार मि.मी.ची सरासरी पूर्ण केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात पुढील आठवडाभर पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
समाधानकारक पाऊस झाल्याने कोकणातील धरणातील जलसाठा अन्य विभागाच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 35 धरणे पाऊस दिनाच्या 50 दिवसातच ओव्हरफ्लो झाली आहे.

गेल्या आठवड्यात पाचशे मि.मी.पेक्षा सरासरी पाऊस झाल्याने रत्नागिरीच्या प्रमुख नद्यांनी जलस्तर वाढला होता.  जगबुडी, कोदवली, काजळी या प्रमुख नद्यांच्या परिससरात पूरस्थितीही उद्भवली होती. मात्र, त्या नंतर पाऊस ओसरल्याने पूरस्थिती  ओसरली. आता मात्र पावसाने उसंत घेत चांगली वाटचाल केली. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने या वर्षीही अर्जुना मध्यम प्रकल्प जुलैच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के जलसाठा झाला.