जिल्ह्यात ‘आपले सरकार’च्या 36 केंद्रांवर ऑपरेटरच नाही

रत्नागिरी:- नागरिकांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळावीत यासाठी राज्य सरकारने आपले सरकार पोर्टल सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यात ५२७ केंद्रांना मंजूरी मिळाली असून ४९१ केंद्रांचे कामकाज सुरळीत आहे तर ३६ केंद्रांवर ऑपरेटर नाही.

राष्ट्रीयता प्रमाणपत्र, कृषी दाखला, जन्मदाखला, आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यासह विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी अर्जदारांना तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालया लांबच लांब रांगेत उभे रहावे लागत होते. त्यामधून लोकांना सुट मिळावी यासाठी आपले सरकार ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या लोकसंख्येची गावे किंवा कमी लोकसंख्येची गावे एकत्र येऊन आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ही सेवा चार वर्षांपुर्वी सुरु झाली. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटरचीही नेमणूक झाली. त्यांना आवश्यक साहित्य ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करुन दिले जाते. हे केंद्र सुरु करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीला संबंधित ग्रामपंचायतीकडून १२ हजार ३३१ रुपये दर महिन्याला भरावे लागत आहेत. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील लोकांची सोय झाली रांगामध्ये तासन तास उभे राहण्यापासून सुटका झाली आहे. जिल्ह्यात ५२७ केंद्रांना मंजूरी मिळाली होती. त्यातील ४९१ केंद्रांमध्ये सध्या ऑपरेटर कार्यरत असून तेथील संदर्भ सेवा योग्य पध्दतीने लोकांना दिल्या जात आहेत. यामध्ये नेटवर्कचा प्रश्‍न असून बीएसएनएलची ऑप्टीकल फायबर योजना लागू केल्यानंतर सुटू शकतो. सध्या ग्रामपंचायत बीबीएनएलची सेवा घेत आहे. तर काही ठिकाणी ऑपरेटर मोबाईलच्या नेटचा वापर या सेवेसाठी करत आहे.