जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत 13 जुलै रोजी

रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण १३ जुलै रोजी काढण्यात येणार आहे. गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण संबंधित तहसीलदार कार्यालयात होईल. याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ जून रोजी मतदारसंघाची अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता (ओबीसी) जागा आरक्षित ठेवता येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. पंचायत समिती आरक्षण सोडतीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग निश्चित करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचा उतरता क्रम विचारात घेतला जाईल. आरक्षण सोडतीचा अहवाल तसेच सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे पूर्वी ५५ गट होते. नव्या रचनेनुसार जि. प. गटांची संख्या ७ ने वाढून ती ६२ वर जाऊन पोहोचली आहे. तर पंचायत समितीचे गण ११० होते. त्यामध्ये १४ वाढल्याने ही संख्या १२४ वर जाऊन पोहोचली आहे. आता आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. आरक्षण झाल्यानंतरच पुढची गणिते ठरणार आहेत. सध्या बंड नाट्यानंतर सत्तांतर नाट्य रंगले आहे. त्यामुळे सध्या राजकीय उलथापालट मोठ्या प्रमाणात सुरू आहे.