रनपच्या शाळांना अच्छे दिन; 18 शाळांची पटसंख्या वाढली

रत्नागिरी:- पालिकेच्या प्राथमिक शाळांना सध्या चांगले दिवस आले आहेत. गळती थांबवत पालिकेच्या १८ शाळांची पटसंख्या वाढली आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या दामले विद्यालयातील सेमी इंग्लिशचा पॅटर्न यशस्वी ठरला आहे. अनेक खासगी शाळांमधील मुलांचा कल दामले शाळेकडे वाढला आहे. काही विद्यार्थी वेटिंगवर असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने सांगितले. एकुणच १९०० असलेली ही पटसंख्या आता २१३६ च्या वर गेली आहे.

जिल्हा परिषद किंवा पालिकांच्या शाळामधील सुमार शिक्षणामुळे पटसंख्या घसरत गेली आहे. अनेक शाळांमध्ये ४ किंवा एक विद्यार्थी शाळा देखील सुरू आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची वेळ आली. मात्र रत्नागिरी पालिकेच्या दामले पॅटर्न शिक्षणाचा दर्जाच बदलुन टाकला आहे. एका शाळेने पालिकेच्या शाळांबाबतचा गैरसमज दूर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न पालिकेने केला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागा अंदर्गत यापूर्वी २२ शाळा होत्या. परंतु सुमार शिक्षणामुळे अनेकांनी आपल्या मुलांना डोनेशन आणि जादा शुल्क भरून खासगी शाळांमध्ये घालणे पसंद केले. त्यामुळे पालिकेच्या शाळांना वाईट दिवस आले. दिवसेंदिवस पटसंख्या घटत गेली. याचा एवढा गंभिर परिणाम झाला की पालिकेला ४ शाळा बंद कराव्या लागल्या.

काही वर्षांपूर्वी पालिकेने एक एतिहासिक निर्णय घेतला. प्रयोगिक तत्वावर चांगला प्रतिसाद असलेल्या दामले विद्यालयामध्ये सेमी इग्लिश सुरू केले. त्याचा एवढा चांगला परिणाम झाला की विद्यार्थ्यांची गळती थांबून पटसंख्या वाढली. सध्या पालिकेच्या १८ शाळा सुरू असून त्यामध्ये ४ ऊर्दु माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. गेल्यावर्षी या शाळांची पटसंख्या १९२७ होती. मात्र या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये ही पटसंख्या वाढुन २ हजार १३६ झाली आहे. पालिकेने शैक्षणिक दर्जा सुधारल्याने पटसंख्या वाढताना दिसत आहे. विशेष करून कोविडच्या काळात अनेकांच्या नोकरी व्यवसायावर गदा आली. अनेकजण आर्थिकदृष्टया अडचणीत आले. त्यामुळे बहुतेक पालक पालिकेच्या शाळांकडे वळले असावे, असा अंदाज शिक्षण विभागाचा आहे.