रत्नगिरी:- निवळी येथील दळवी कॅश्यु दुकानातून दोनवेळा काजूगरांची चोरी करणाऱ्या तिघांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तालुक्यात केलेल्या अनेक चोरींचा उलगडा झाला आहे. रज्जाक असलम मुजावर,(२३, मिरज, सांगली) साहिल इसाक सायनावाले (२२, गोवा), अक्षय सतोष पाटील, (२४, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , दळवी कश्यु मधून 26 एप्रिल रोजी आणि 29 जुन रोजी अशी दोन महिन्याच्या फरकाने दोन वेळा चोरी झाली होती. या चोरीचा तपास पोलिस करत होते. याच दिवशी म्हणजे २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास ग्रामिण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य आणि त्यांचे सहकारी गोळप परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक कार संशयास्पद दिसून आली. या कारजवळ जाऊन चालकाची चौकशी करणार इतक्यात चालकाने गाडी सुस्साट वेगाने पळवली. पोलिसांना त्यांच्या दाट संशय आला. ते तिघेजण पावसच्या दिशेने गाडी दामटवू लागले. पोलीसानी लगेचच पूर्णगड पोलिसाना माहिती दिली. पूर्णगड पोलिसांनी पावस फाटा येथे त्यांची गाडी अडवली. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये काजुचे पोते आढळून आले. त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्या काजु निवळी येथील दळवी दुकानातील चोरीच्या असल्याचे सांगीतले. तसेच गाडीमध्ये घरफोडी करण्यासाठी हत्यारे ठेवण्यात आली होती. त्यांचेकडे २१ हजार रुपयांची रोख रक्कम, सिगारेट पाकिटे आदी साहित्य मिळुन आले. त्यानंतर त्यांनी गजानन महाराज मंदीर गोळप येथील मंदिरात दानपेटी फोडल्याची कबुली दिली. तसेच चिपळुण खेर्डी येथील टपरी फोडल्याचीही कबूली दिली.
दरम्यान त्यांनी दोन महिन्यांपूर्वी निवळी येथील दळवी कश्युमध्ये चोरी करुन सुमारे २ लाख २० हजार 700 रुपयांच्या काजू बिया चोरल्याचीही कबुली दिली.
त्यांच्याकडून कार, हत्यारे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल असा एकुण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पुर्णगड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे व पोलीस अमलदार शिवाजी इंदुलकर, सतीश साळवी (चालक), उदय वाजे, पोलीस नाइक वैभव मोरे तसेच पुर्णगड पोलीस ठाणेचे पोलिस हवालदार ललीत देयुसकर, पोलिस हवालदार योगेश भातडे (चालक) यानी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.