अकरावीच्या प्रवेशासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची तयारी; दाखल्यांसाठी मोठी गर्दी

रत्नागिरी:- नुकताच दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून, अकरावी प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास अवधी असला तरी प्रवेश पूर्व तयारीची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमवी सुरू झाली आहे. विविध दाखले काढण्यासाठी सेतू व ई-सेवा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे.

दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वाची वर्षे आहेत. या दोन्ही बोर्ड परीक्षांचे निकाल लागले असल्याने लवकरच पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या अकरावी प्रवेश नोंदणी सुरू झाली असून, लवकरच प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची प्रवेश पूर्व तयारीची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशांसाठी लागणार्‍या आवश्यक कागदपत्रांची यादी बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी नोटीस बोर्डवर लावली आहे. विद्यार्थी व पालकांनी या यादीप्रमाणे कादपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. प्रवेशासाठी आवश्यक विविध दाखले काढण्यासाठी सेतू तसेच महा ई-सेवा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे. वेळे आधीच दाखले मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मिळालेल्या दाखल्यांच्या साक्षांकीत प्रती काढण्यासाठी गर्दी होत आहे.
मागील महिन्यामध्ये उच्च शिक्षणासाठी लागणार्‍या विविध दाखल्यांची यादी तंत्रशिक्षण संचलनालयाने जाहीर केली होती. त्यामुळे बहुतांश पालकांनी निकालापूर्वीच दाखले मागणी अर्ज जमा केले आहेत. त्यामुळे दाखल्यांसाठी होणारे वादा-वादीचे प्रकार कमी झाले आहेत. दरम्यान, प्रवेश पूर्व तयारी सुरु असतानाच दुसरीकडे गुणपत्रकांची आस विद्यार्थ्यांना लागली आहे.