रत्नागिरी:- भात लावण्या जवळ आल्या तरीही काही शेतकर्यांना वेळेत खत पुरवठा झालेला नसल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही शेतकर्यांनी जादा पैसे घेऊन खत विकत घेतल्याचेही शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. आरसीएफकडून 14 हजार मेट्रीक टनापैकी साडेआठ हजार मेट्रीक टन खत पुरवठा झाला आहे. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे कृषी विभागाकडून पुढे आले आहे.
रशिया-युक्रेन युध्दामुळे खताचा तुटवडा जाणवू नये यासाठी एप्रिल महीन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हास्तरावरुन तयारी सुरु झाली. शेतकर्यांनाही लवकर मागणी करावी असे सांगण्यात आले होते; मात्र आरसीएफकडून खताचा वेळेत पुरवठाच न केल्या गेल्याने शेतकर्यांची तारांबळ उडाली. कोकण रेल्वे मार्गावर खत पुरवठा करण्यासाठीचा ठेकेदारच विलंबाने नियुक्त केला गेला. परिणामी खत आणणारे रेक उशिराने दाखल झाले. त्यातही सातत्य नसल्यामुळे आतापर्यंत अवघे 8 हजार 500 मेट्रीक टन खत आले आहे. जिल्ह्यात सर्वच शेतकर्यांना याचा फटका बसला आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे भात लावण्याही उशिराने सुरु झाल्या आहेत. तरीही अजुन संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील शेतकर्यांना खत पुरवठा झालेला नाही. काही शेतकर्यांनी शासकीय दरापेक्षा अधिक दराने खत विकत घेतले आहे. खत विक्रीमध्ये आंबा बागायतदारांना प्राधान्य दिल्यामुळे हा गोंधळ झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लावण्या सुरु होत आले तरीही अजुन 40 टक्के खत आलेलेच नाही. या भोंगळ कारभाराविराधात नाराजी व्यक्त केली जात आहे.