४० हजार ग्रामस्थांना लाभ; तुलनेत यंदा टंचाईत वाढ
रत्नागिरी:- मोसमी पाऊस अजुन स्थिरावला नसल्यामुळे जिल्ह्यातील टँकरची मागणी अजुनही कमी झालेली नाही. जिल्ह्यात ९० गावातील १८८ वाड्यांमध्ये अजुनही १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सुमारे ४० हजार लोकांना टँकरने पाणी देण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे.
जुनच्या पहिल्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस सुरु होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता; मात्र १० जुनला मॉन्सून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाला. अजुनही पाऊस स्थिरावलेला नाही. सध्या दिवसा कडकडीत उन तर रात्री पाऊस अशी स्थिती आहे. यंदाचा उन्हाळा कडकडीत गेला होता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात टंचाईची झळ अधिक बसलेली आहे. आतापर्यंत सुमारे तेराशेहून अधिक टँकरच्या फेर्यांद्वारे लाखो लिटर पाणी १८८ वाड्यातील लोकांना पुरवले गेले. उन्हामुळे बाष्पीभवन अधिक झाल्यामुळे विहीरींची पाणी पातळी खालावली, नद्या-नाल्यांची पात्रं कोरडी पडली. परिणामी मेच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची चणचण जाणवू लागली. गतवर्षी ६७ गावातील ११३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. दोन दिवसांपुर्वी पाऊस झाला असला तरीही अजुन नद्या, नाल्यांना पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे अजुनही अनेक भागांमध्ये टँकरने पाणी द्यावे लागत आहे.