रत्नागिरी:- देशात असलेल्या छोटया व्यावसायिकांना भांडवल उभं करणं सहज शक्य होत नाही. अगदी छोटा व्यवसाय असेल तरी याची अडचण येते हे लक्षात घेऊन सुरु करण्यात आलेल्या मुद्रा कर्ज योजनेत कोणत्याही जामीनदाराशिवाय वित्त पुरवठा करण्यात येतो. या अंतर्गत मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात जिल्हयात 12 हजार 931 जणांना 184 कोटी 63 लाखांहून अधिकचे कर्ज सहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
बँकेमार्फत ही योजना शासनातर्फे राबविण्यात येते. वैयक्तिक व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींना सुलभरित्या वित्तसहाय्य मिळावे असा याचा उद्देश आहे. देशात असे साधारण 12 कोटी व्यावसायिक आहेत. बँकेसह बिगर बँकिग वित्त संस्था तसेच पात्र वित्त पुरवठादार संस्था यांनाही बँकेप्रमाणेच कर्ज पुरवठा करण्यास मुभा दिल्याने मोठया प्रमाणावर वित्त सहाय्य उपलब्ध होत आहे.
मुद्रा अंतर्गत 50 हजारांपर्यंत शिशू, 50 हजार 1 ते 5 लाख तरुण आणि त्यापुढे 10 लाखांपर्यंत तरुण गट मानून वित्त पुरवठा केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात शिशू गटात 4 हजार 948 जणांना 16 कोटी 67 लाख 30 हजारांचा कर्ज पुरवठा करण्यात आला. किशोर गटात 6 हजार 341 जणांना 115 कोटी 35 लाख 87 हजारांचे कर्ज उपलब्ध झाले तर तरुण गटात 742 जणांना एकूण 52 कोटी 84 हजार कर्ज पुरवठा करण्यात आला.