दर कमी केल्याचा पेट्रोलपंप मालकांना फटका; 31 मे ला पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय

रत्नागिरी:- इंधनावरील कर कमी करुन केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिली हि गोष्ट जरी चांगली असली तरी त्याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसत आहे. एका बाजूला शासनाने सन २०१९ पासून पेट्रोल पंप चालकांच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. तर आता जनतेला सुट देताना शासन आमच्या खिशातून पैसे काढत आहे. याच्या विरोधात दि. ३१ मेला पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

त्यादिवशी पेट्रोल विक्री मात्र सुरु राहणार असल्याचे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी बोलताना सांगितले. मात्र यामुळे जूनच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. 
देशात वाढलेले पेट्रोल ‚ डिझेलचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. प्रवास खर्चात वाढ झाल्याने महागाई देखील वाढू लागली. काही दिवसांपूर्वी तर महागाईने आजवरचा उच्चांक गाठल्याची आकडेवारी देखील समोर आली होती. दरम्यान, या सर्व  घडामोडींमध्ये केंद्र सरकरानं पेट्रोल ‚ डिझेलच्या दरात मोठी कपात केली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देखील मिळाला. पण, त्यामुळे पेट्रोल ‚ डिझेल चालक ‚ मालक मात्र आक्रमक झाले आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वांना हजारो कोटींचा फटका बसल्याचे आकडे देखील समोर आले होते.महाराष्ट्रासह  देशातील पेट्रोल ‚ डिझेल चालक मालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरातील चालक ‚ मालक ३१ मे रोजी तेल कंपन्यांकडून किंवा ऑईल डेपोमधून पेट्रोल ‚ डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावे किंवा ते पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी  सांगितले.ऑईल कंपन्या आजही मस्ती करत आहे. त्या सरकारला काही बोलू शकत नसल्याने त्या आपला राग पेट्रोल पंप चालकांवर काढून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आज पेट्रोल पंप चालक अडचणीत आहे. त्यांना मोठा अर्थिक फटका बसला असल्याचेही श्री.लोध यांनी सांगितले.