रत्नागिरी:- शासनाकडून अनुदानच न आल्यामुळे जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सुमारे दोनशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
मार्च, एप्रिल या दोन महिन्यांचे वेतनासाठी आवश्यक एक कोटीहून अधिकचा निधी महिला व बाल कल्याण विभागाला प्राप्त झालेला नव्हता. तांत्रिक गोष्टींमुळे हा पगार रखडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वेतन थेट कर्मचार्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. वेतनाच रक्कम बीडीएसवर काढण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला कर्मचारी, अधिकार्यांची पगार बिले कोषागार विभागाला सादर केली जातात. त्यानंतर सर्वसाधारणपणे १ ते ५ तारखेपर्यंत पगार जमा होतात. गेल्या दोन महिन्यांमध्ये पगारच जमा झालेल्या नसल्यामुळे कर्मचार्यांची तारांबळ उडाली आहे. कर्जाचे, विम्याचे हप्ते, घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च यासह विविध गोष्टींसाठी आवश्यक पैशांची तरतूद सलग दोन महिने करणे अशक्य होऊन बसले आहे. मागील दोन महिन्याबरोबरच मे महिन्याचाही पगार होणे अशक्य असल्याचे दिसत आहे. २० मेपर्यत सर्वांची पगार बिले सादर करण्यात आली आहेत; मात्र अजुनही आवश्यक अनुदान जिल्हा परिषदेकडे जमा झालेले नसल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकारामुळे कर्मचार्यांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.