पैशाच्या वादातून कुर्ली येथील एकाला ठार मारण्याची धमकी

रत्नागिरी:-तालुक्यातील कुर्ली फाटा येथे पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकारही समोर आला आहे. ही घटना काल सोमवार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय जाधव असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची तक्रार त्यांची पत्नी सानिका जाधव हिने रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दिली.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय जाधव व संशयित आरोपी नंदकुमार जांधव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशावरून वाद सुरू होता. दरम्यान ९ मे रोजी सकाळच्या सुमारास सानिका व तिचे पती कुर्ली फाटा येथे आले होते . यावेळी ॲक्टिवा गाडीवरून आलेल्या निलेश याने विजय जाधव यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच तुम्ही जर माझे पैसे दिले नाहीत तर तुम्हाला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. यावेळी पतीला मारहाण होत असल्याचे पाहून पत्नी सानिका या वाचवण्यासाठी पुढे आल्या असता आरोपी याने त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. अशी तक्रार सानिका जाधव यांनी पोलिस स्थानकात दिली आहे . सानिका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी निलेश नंदकुमार जाधव ( रा . आडीवरे ता . राजापूर ) याच्याविरूद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.