रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवले; महिलेचा जागीच मृत्यू

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. खेड येथील खवटी बस स्टॉप समोर रविवारी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. रस्ता ओलांडणाऱ्या एका वृध्द महिलेला भराव चारचाकीने चेंडूसारखे उडवले. या अपघातात वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

वंदना सखाराम मोहिते ( 55, खवटी बौध्दवाडी, खेड ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, वंदना मोहिते या सायंकाळी 7 वा. च्या सुमारास दुकानातून जिन्नस घेवून घरी जात असताना रस्ता ओलांडत होत्या. एवढयात पंकज चव्हाण ( चिंचवली , भाटवाडी , खेड ) हा आपल्या ताब्यातील टाटा पिकअपने खवटी ते बोरघर असा भरधाव वेगाने जात असताना वंदना यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की , वंदना यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी बोंडकर व इतर घटनास्थळी दाखल झाले. उपस्थितांनी वंदना यांना कळंबणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पिकअप चालक पंकज चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.