रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे-धामेलीवाडी येथे पाच वर्षांचा गवा मृतावस्थेत सापडला. आज सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. रत्नागिरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचे कारण समजण्यासाठी मृत गव्याचे
शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली. गव्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोतवडेचे पोलिस पाटील श्री. पटेल यांनी याची खबर वन विभागाला दिली. सकाळी साडे आठ वाजता धामेलीवाडी येथे हा गवा मृतावस्थेत आढळुन आला. या दरम्यान स्थानिकांनी मृत गवाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी मृत्युबाबत तर्क वितर्क बांधले गेले. काहींनी मोठ्या गव्याच्या धडकेत तो मृत पावला असले किंवा आजारी असल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. खबर मिळताच वनरक्षक आणि
वनपाल श्री. कांबळे व अन्य सहकारी बारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत गव्याची पाहणी करून पंचनामा केला.
गवा चार ते पाच वर्षांचा नर होता. तो कळपाबरोबर आला असवा, मात्र परतत असताना त्याचा अचानक मृत्यू झाला असावा, असे स्थानिकांचे मत होते.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मृत गव्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा त्याच्या पोटात काहीच नसल्याचे उघड झाले. उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मृत गव्याची विल्हेवाट लावण्यात आली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. पावस, गावखडी, देवरुख आदी भागामध्ये ते आढळून येतात. हा गवा खाडीकिनारी फिरत असल्याने त्या भागात त्याला अपेक्षित गवत-चारा मिळाला नसावा त्यामुळे उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.