रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ४३ कोटी ५७ लाख ४४ हजार रुपयांचा ढोबळ तर २० कोटी ७१ लाख ४४ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत थोडी वाढ झाली असून देशात बँक दुसर्या क्रमांकावर आहे. हे आरबीआयच्या अधिकार्यांकडून सांगितले जात आहे, असे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.
आर्थिक वर्षातील उलाढालीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, बँकेच्या भागभांडवलात १ कोटी रुपयांनी वाढ झाली असून ते ५३ कोटी ५९ लाख १३ हजार रुपयांवर पोहोचले. बँकेचा गंगाजळी, इतर निधी २१० कोटी ५७ लाख, स्वनिधी २६४ कोटी १६ लाख, बँकेतील ठेवी २२८८ कोटी १४ लाख आहेत. एकूण कर्जव्यवहार १३७९ कोटी ३४ लाख ८३ हजार रुपये आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेचा १७८ कोटी रुपयांचा कर्जव्यवहार कमी झाल्याने ५ कोटीचा तोटा घटला. बँकेचा एकूण व्यवसाय ३६६७ कोटी ४८ लाख ८४ हजार रुपये आहे. ११८१ कोटी ५७ लाख रुपयांच्या गुंतवणुका बँकेत आहेत. २७७८ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपयांचे खेळते भांडवल आहे. सलग दहाव्या वर्षी बँकेचा नक्त एनपीए शुन्य टक्के असून सलग अकराव्या वर्षी बँकेचा ऑडीटवर्ग अ आहे. बँकेचा सीआरएआर १२.५३ टक्के असून नाबार्ड निकषानुसार तो ९ टक्के अपेक्षित असतो.
बांबू लागवडीसाठी हेक्टरी एक लाख रुपये कर्जपुरवठा केला जाणार असून लाभार्थ्यांनी पहिल्या दोन वर्षात फक्त व्याजच भरावयाचे आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळाने सचिवांवर लक्ष ठेवले तरच गैरव्यवहार टाळता येतील. यासाठी बँकेकडून वार्षिक तपासणी केली जाणार आहे. जिल्हा बँकेने पर्यटनविषयक अनेक योजना जाहीर केल्या आहेत. दुर्दैवाने या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही अशी खंत डॉ. चोरगे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक सुधीर कालेकर, अॅड. दीपक पटवर्धन, जयवंत जालगावकर, संजय रेडीज, कार्यकारी संचालक सुनिल गुरव, सरव्यवस्थापक अजय चव्हाण हे उपस्थित होते.
साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करु
साखर कारखान्यांना बँकेमार्फत ११ ते ११.५० टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. चार, पाच बँका एकत्र येऊन हा कर्जपुरवठा होतो. गेल्या वर्षभरात तांत्रिक कारणांमुळे साखर कारखान्यांना अपेक्षेनुसार कर्जपुरवठा बँकेने केला नाही. परिणामी बँकेच्या नफ्याचे प्रमाण घटले असून पाच कोटींचा फटका बसला. जिल्हा बँकेचा नफा वाढावा, नावलौकिक कायम रहावा यासाठी धाडसाने पावले उचलणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन कर्जाची नियमित परतफेड करणार्या साखर कारखान्यांना नवीन आर्थिक वर्षात कर्जपुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, असे डॉ. चोरगे यांनी सांगितले.