दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादात विकासाला खीळ

रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनातील दोन उच्चपदस्त सनदी अधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध काही शमत नसल्याचे चित्र आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना समान अधिकार असताना प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी समान पदावर असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या अधिकारावर गदा आणल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कोकण आयुक्तांकडे याबाबत दाद मागितली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी विषय ताणून धरल्याने विविध कामांच्या अनेक फायली अडकून पडल्या आहेत.  मंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबतचे म्हणणे एका अधिकाऱ्यांने मांडल्यानंतर हा विषय पुढे आला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये अधिकारांवरून जोरदार धुसफुस सुरू आहे. शासनाने दोनही अधिकाऱ्यांना समान ३८-३८ अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्या-त्या योजना, विभागामध्ये हस्तक्षेप केला जात नाही किंवा विश्वासात घेऊन ती कामे केली जातात. परंतु समान पदावर असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याला याबाबत विश्वासात न घेता त्यांच्या अखत्यारितील विषय देखील प्रथम क्रमांकाचे अधिकारी करत असल्याचा आक्षेप आहे. कोणत्याही कामाची माहिती दिली जात नाही. परस्पर त्या फायली मंजूर केल्या गेल्यावर एका अधिकाऱ्यांने कोणत्या नियमाने या फायली मंजूर केल्या जातात याची माहिती मागविली आहे. मात्र ही माहिती दिली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हा विषय ताणला जात आहे.

यापूर्वी मंत्री सामंत यांनी यामध्ये लक्ष घेतले होते. दोन्ही अधिकाऱ्यांमधील हा वाद मिटला पाहिजे. जिल्ह्याच्या विकासावर त्याचा परिणाम होत आहे, सामंत यांनी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. तेव्हा, माझा कारभार हा लोकाभिमुख आहे. जनतेच्या भल्याचे निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे, अशी भूमिका डॉ. पाटील यानी मांडली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी चर्चा झाली, तेव्हा हे अंतर्गत विषय पुढे आले. शिंदे यांनी याबाबत कोकण आयुक्तांकडे दाद मागितली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी हा विषय लवकरात लवकर संपुष्टात आणावा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.