रत्नागिरी:- राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरणमध्ये शिपाई, लिपिक पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेत नोकरी लावण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील १३ जणांना एका ठकसेनाने १२ ते १३ लाखाला गंडा घातला. नुकताच हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी फसवणूक झालेल्या परिक्षार्थिंनी गणपतीपुळे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान गंडा घालुन त्या ठकसेनाने रत्नागिरीतून पोबारा केल्याचे समजते.
विजयसिंह राजवर्धन पाटील (रा.जयगड,रत्नागिरी) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याने या १३ जणांना राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरणमध्ये शिपाई व लिपिक पदासाठी सर्वांना नोकरी देतो, असे सांगुन सगळ्यांकडून लाखोंची रोख रक्कम घेतली. त्यासाठी १३ मार्चला या सर्वांची शहरातील एका शाळेत ११ ते दीड या वेळेत लेखी परीक्षा घेतली. परिक्षेसाठी शाळेचा शिक्षक वर्ग आणि शिपाई वर्ग परिक्षेसाठी हजर होते. परिक्षकांना त्यादिवशीचे योग्य मानधन देण्यात आले. परीक्षा झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांची निकाल लागेल असे सांगितले. ५ एप्रिल पासून कामावर हजर व्हावे लागेल व तुमचे १ महिन्याचे ट्रेनिंग होईल, असेही श्री. पाटील यांनी परिक्षार्थिंना सांगण्यात आले. परंतू आठ दिवस झाल्यानंतरही परिक्षेचा निकाल लागला नाही. म्हणून श्री. पाटील याला फोन करण्याचा प्रयत्न केल्यावर तो बंद लागला. त्यानंतर विजयसिंह पाटील हा जयगड येथे भाड्याने रहात असलेल्या घरातून सर्व सामान घेऊन फरार झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे १३ जणांच्या लक्षात आले. त्यांनी गणपतीपुळे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून लवकरात लवकर या प्रकरणााचा तपास करावा, अशी मागणी केली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत सर्व माहिती घेऊन संबंधित पोलिस यंत्रणेला चौकशी करण्याच्या सूचना प्राधिकरणाने दिल्याचे समजते. मात्र संशयित फरार असून त्याचा मोबाईल बंद असल्याने जयगड पोलिस त्याच्या मागावर आहेत. ज्या शाळेमध्ये ही परिक्षा घेण्यात आली, त्या शाळेने या परिक्षेबाबत खात्री न करता परवानगी दिली कशी, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.