रत्नागिरी :- कोरोनाने देशभरात हातपाय पसरलेले असून वयोवृध्दांना त्यापासून जपा अशा सुचना सर्वच स्तरावरुन दिल्या जात आहेत. परंतु अनेक सेवानिवृत्तांना दरमहा मिळणार्या पेंशनसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे हजारो निवृत्त कर्मचारी त्या पेशनसाठी निवेदन घेऊन फिरत आहेत. त्यांची हाक प्रशासनापर्यंत पोचत नाही. लोकप्रतिनिधींचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे व्याधीग्रस्त आजारावरील औषधांची प्रतिक्षा या विवंचनेत हे निवृत्त कर्मचारी अडकले आहेत.
जिल्हा परिषद सेवानिवृतांचे वेतन लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली जात आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. एप्रिल महिन्याचे निवृत्तीवेतन अद्यापही मिळालेले नाही. मार्च वेतन मिळण्यासाठी 23 एप्रिलपर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांची पंचाईत झाली आहे. याबाबत कोषागार कार्यालयाशी संपर्क साधला तर त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. सेवानिवृत्त हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या प्रश्नांची दखल त्वरीत करण्यात यावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने आदेश दिले आहेत. पंतप्रधानांनीही सप्तपदीचे पालन करा अशा सुचना दिल्या आहेत. घरातील ज्येष्ठमंडळींची काळजी सर्वानी घ्या अशा सुचना दिल्या जात आहेत. ज्या वयोवृध्दांना जुने आजार आहेत, त्यांना जपणे आवश्यक आहे. ह्यदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजाराने अनेक वृध्द ग्रस्त आहेत. त्यासाठी महागडी औषधे लागतात. पेंशन वेळेवर मिळाली नाही तर ती औषधे घेणे शक्य होत नाही. एप्रिल महिन्यांची पेंशन मिळण्यास उशिर होत असून ज्येष्ठांना तोंडदेखला दिलासा नको, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सेवानिवृत्तांची जनसेवा समितीकडून करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.