रत्नागिरी:-जिल्हा परिषदचे सन 2022-23 चे केवळ स्वत:च्या उत्पन्नाचे एकत्रित महसूल, भांडवल व वित्तप्रेषणासह 20 कोटी 53 लाख 83 हजार रुपयांचा मूळ अंदाजपत्रक अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत सादर केले. या अंदाजपत्रकाला एकमताने मंजूरी देण्यात आली.
जि.प.च्या हिंदू हृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे सभागृहात बजेटला मंजूरी देण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम, सदस्य रचना महाडिक, अण्णा कदम, रोहन बने, संतोष थेराडे, विनोद झगडे आदी उपस्थित होते.
या सभेत जि.प.च्या सन 2021-22 च्या एकत्रित महसूल भांडवल व वित्तप्रेषणासह रक्कम 39 कोटी 39 लाख 10 हजार रुपयांचे अंतिम सुधारीत अंदाजपत्रक व सन 2022-23 च्या महसूल, भांडवल व वित्तप्रेषणासह 20 कोटी 53 लाख 83 हजार रुपयांचा मूळ अंदाजपत्रक यावेळी सादर करण्यात आले. त्याला एकमताने मंजूरी देण्यात आली. प्रत्येक विभागानुसार तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्ष – 87 लाख 43 हजार 900, सामान्य प्रशासन 88 लाख 75 हजार, ग्रामीण व पाणी पुरवठा विभाग 2 कोटी 71 लाख 58 हजार 888, समाजकल्याण विभाग 1 कोटी 70 लाख 87 हजार 828, दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी 71 लाख 31 हजार 642, महिला व बालकल्याण विभागासाठी 85 लाख 43 हजार 914, शिक्षण विभागासाठी 70 लाख , बांधकाम विभाग 2 कोटी, पाटबंधारेसाठी 1 लाख, आरोग्य विभागासाठी 35 लाख, शेती विभागासाठी 60 लाख, पशुसंवर्धन विभागासाठी 50 लाख, सामुहिक विकासासाठी 1 कोटी 10 लाख, निवृत्ती वेतनासाठी 30 लाख, संकीर्णसाठी 2 कोटी 75 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सन 2021-22 चे सुधारीत अंदाजपत्रक करून विभागांना विविध विकास योजना तसेच मागासवर्गीय कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण विभागाच्या योजना व 5 टक्के दिव्यांग कल्याण योजना तसेच इतर योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.