माझी वसुंधरा अभियानासाठी पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतीमध्ये माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना तालुक्यांचे पालक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे अधिकारी गावोगावी भेटी देवून माझी वसुंधरा अभियांनाचा आढावा घेत आहेत.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत संबंधित ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा आढावा १५ एप्रिलपर्यंत सादर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने विविध विभागाच्या अधिकार्‍यांना तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींनी माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार गावांमध्ये वृक्षारोपण, स्थानिक, भारतीय प्रजातींची लावलेल्या झाडांची संख्या, हेरिटेज ट्री, वृक्ष गणना, रोपवाटिका निर्मिती, नव्याने केलेल्या हरीत क्षेत्रांचा विकास, जैव विविधता नोंदवही, वृक्ष आराखडा, घनकचरा संकलन व वर्गीकरण, ओला कचर्‍यावरील प्रक्रिया, सुक्या कचर्‍याचा पुनर्वापर, प्लास्टिक कचर्‍याचे व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी पुढाकार, एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी,जैव कचर्‍याचेव्यवस्थापन, फटाक्यावर बंदी घालण्याच्या दिशेने पुढाकार, कृषीकचरा व्यवस्थापन, उज्वला योजना आणि गॅस जोडणी, सायकलींग करता वाट मार्ग निर्मीती, इलेक्ट्रीक वाहन धोरण, रेस टू झिरो, पाण्याचे लेखा परीक्षण अहवाल, सार्वजनिक इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वे स्टिंग, विहीर पुनर्स्थापना उपक्रम, ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन प्रकल्पांतर्गत शेतजमीन टक्केवारी, पाणलोट विकास उपक्रमासाठी पुढाकार, सणांच्या वेळी जलप्रदुषण कमी करणे, पर्यावरण पूरक मूर्तीचा प्रचार, सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट भूमी, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या निकषानुसार 5 हजार गुण असून त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने कोणकोणती कामे केली आहेत त्याची पाहणी करुन अधिकार्‍यांनी संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवकांना कामकाजाबाबत सूचना दिल्या आहेत. निवड झालेल्या ग्रामपंचायतीत उच्चतम दर्जाची कामगिरी व्हावी यासाठी ग्राम कृती गटाची स्थापना करण्यात आली आहे.